पुणे : पुणे पोलिसांनी कर्णबधिर तरुणांवर केलेल्या लाठीहल्ल्याची दखल अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली. या तरुणांवर झालेल्या हल्ल्याबाबत आज सखोल अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. तसंच सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


दरम्यान या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. विरोधकांसह सामान्य नागरिकांनीही सोशल मीडियावरुन या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे आज विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील या घटनेवरुन हल्लाबोल होण्याची शक्यता आहे.

VIDEO | कर्णबधिरांवर झालेल्या लाठीमाराची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल




ज्या पोलिसांनी कर्णबधिर तरुणांना मारहाण केली त्यांची आणि मागण्यासंदर्भातील अधिकाऱ्यांचीही चौकशी करु, असं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या आंदोलक तरुणांची भेट घेतली. यावेळी या आंदोलकांनी दुभाषामार्फत आपल्या व्यथा पोटतिडकीने त्यांच्यासमोर मांडल्या. दोन्ही नेत्यांनी या तरुणांचं म्हणनं ऐकून घेत सरकारला जाब विचारण्याचं आश्वासन दिलं. हे फडणवीस सरकार नाही तर जनरल डायर सरकार असल्याची घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली. तर या मूकबधिरांचा शाप सरकारला लागेल. आपण त्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मागू असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

VIDEO | खासदार सुप्रिया सुळे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे कर्णबधिर आंदोलकांची भेट | पुणे | एबीपी माझा



कर्णबधिरांना झालेल्या मारहाणीवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरकारवर चांगलेच बरसले. ज्यांना बोलता येत नाही, ऐकता येत नाही, अशांवर लाठीमार कसला करता?, असा सवाल राज यांनी उपस्थित केला आहे.  या मुलांला सरकारला शाप लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे. आंदोलनकर्त्या तरुणांच्या मागण्या शिक्षणासंबधीच्या आहेत, चुकीच्या नाहीत. शिक्षण घेण्यासाठी सांकेतिक भाषेत शिकवणारे शिक्षक त्यांना हवे आहेत, अशा त्यांच्या काही मागण्या आहेत. या तरुणांच्या मागण्या लवकरच मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल असं आश्वासन राज ठाकरेंनी दिलं आहे.

पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कर्णबधिर तरुण-तरुणी आज पुण्यात आले होते. मात्र आंदोलनकर्त्या तरुणांवर पोलिसांना लाठीचार्च करुन आंदोलन दडपडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्वच स्तरातन या घटनेचा निषेध होताना दिसत आहे.

कर्णबधिरांच्या मागण्या-

ज्या पद्धतीने कर्णबधिर विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते, त्याचा या विद्यार्थ्यांना उपयोग होत नाही. सांकेतिक भाषेतून शिक्षण द्यावे.

सांकेतिक भाषा हा आमचा अधिकार आहे.

कर्णबधिर विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळत नाहीत.

अपंग कल्याण आयुक्त बालाजी मंजुळे दोन महिन्यांमध्ये तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. यालाही या आंदोलनकर्त्यांचा विरोध आहे. बालाजी मंजुळे यांची नंदूरबारच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये डॉक्टरांकडून बोगस प्रमाणपत्र मिळवून कर्णबधिरांच्या नोकऱ्या लाटल्याच्या घटना घडल्यात.  त्यामुळे खरच कर्णबधिर आहेत का याची पुन्हा तपासणी करावी