मुंबई : पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे दिवाळीवर पावसाचं सावट घोंघावत आहे. कर्नाटकात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय पावसामुळे थंडीचं प्रमाणही वाढण्याचा अंदाज आहे.


दोन दिवसांपूर्वीही महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती. मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवला होता. हवामान खात्याचा हा अंदाजा काहीस खरा ठरला होता.


तीन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये पावसाने हजेरी लावली. बुलडाणा आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही भागातही मुसळधार पाऊस झाला होता. पावसाची वाट पाहणाऱ्या लोकांना या पावसाने काहीसा दिलासा मिळाला.


राज्यात अनेक ठिकाणी लोक अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अरबी समुद्रात कर्नाटकजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं पाऊस पडण्याचा अंदाजामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.


सरकारनं राज्यातील एकूण 151 तालुक्यातं दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळ इतका भीषण आहे की, काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे परतीचा पावसामुळे दुष्काळग्रस्त भागासाठी नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकेल.