सिंधुदुर्ग : खासदार नारायण राणे यांनी निवडणूक लढवू नये, अन्यथा पराभवाची हॅटट्रिक होईल, असा सल्ला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे. सिंधुदुर्गात पराभूत झालेला नेता पुन्हा निवडून येत नाही, या इतिहासाची आठवणही केसरकरांनी राणेंना करुन दिली.


नारायण राणे दोन वेळा हरले आहेत. एकदा सिंधुदुर्गात आणि दुसऱ्यांदा वांद्र्यात. याला हॅटट्रिक म्हटलं जातं. त्यांना हॅटट्रिक चुकवायची असेल, तर त्यांनी निवडणूक लढवू नये, असं दीपक केसरकर म्हणाले.

सिंधुदुर्गाचा इतिहास आहे, की एकदा हरलं, की तो कितीही मोठा नेता असला, तरी पुन्हा निवडून येत नाही. त्यामुळे त्यांनी अशी रिस्क घेऊ नये, असा सल्लाही केसरकरांनी दिला. आमदारकीच्या निवडणुकीत दोन वेळा राणेंना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर राणे भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आले आहेत.

नारायण राणे हे मोठे नेते आहेत. त्यांनी सर्वोच्च पदं भूषवली आहेत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी काय करावं, हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं, वैभव नाईक हे तरुण-तडफदार नेते आहेत. त्यांचा चांगला संपर्क आहे. ते निवडून येतील, असं मत केसरकरांनी व्यक्त केलं.

2014 मधील विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघात शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्याकडून नारायण राणेंचा पराभव झाला होता. नऊ हजार मतांच्या फरकाने राणे पराभूत झाले होते.

शिवसेनेचे तत्कालीन आमदार प्रकाश (बाळा) सावंत यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या वांद्र्याच्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीला राणे पुन्हा उभे राहिले. मात्र शिवसेनेच्या तिकीटावर उभ्या राहिलेल्या बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी राणेंना पराभवाचा धक्का दिला.