लातूर : मागील दहा दिवसात एटीएममध्ये राहिलेले पैसे पोलीस कर्मचाऱ्यांनी परत केल्याच्या दोन घटना लातूरमध्ये घडल्या आहेत. संतोष देवडे आणि संतोष पांचाळ या दोन कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे एटीएममधून उशिरा निघालेले पैसे बँकेत परत केले आहेत. लातूरच्या पोलीस अधीक्षक कार्यलयात हे दोघं कार्यरत आहेत.

संतोष पांचाळ हे दहा दिवसापूर्वी मनिषा नगर येथील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. मात्र, पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वीच एटीएएम मशिनमध्ये आधीपासूनच दहा हजार रुपये असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी यासबंधी वरिष्ठांना माहिती दिली. तसेच एटीएम सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

त्यानुसार एटीएम मशिनच्या संबंधित कर्मचाऱ्याकडे दहा हजारांनी रक्कम सुपूर्त केली असून ग्राहकाला बँकेत ती रक्कम दिली जाणार आहे.

अशाचरीतीने, संतोष देवडे या पोलीस कर्मचाऱ्यासमोर एमआयडीसीजवळील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांच्या आगोदर रांगेत उभा असलेल्या ओमकार रांजवण याने कॅशबॉक्समध्ये पैसे असल्याचे देवडे यांच्या निदर्शनास आणून दिले.

एटीएम कार्डचा वापर करून बराच वेळ पैसे मशिनद्वारे आले नसल्याने ग्राहक निघून गेला आणि काही वेळेनंतर 10 हजार रुपये आल्याचा अंदाज वर्तिवला जात आहे.

त्यानंतर देवडे व ओमप्रकाश यांनी तब्बल दोन तास संबंधित ग्राहकाची वाट पाहिली. परंतू कोणीही तक्रार घेऊन आले नसल्याने त्यांनी ही 10 हजारांची रक्कम बँक व्यवस्थापक राकेशाकुमार चौधरी यांच्याकडे सपूर्द केली आहे. त्यामुळे एटीएम मशिनमधून 10 हजाराची रक्कम मिळाली नसल्याची तक्रार येताच त्या ग्राहकास ही रक्कम अदा केली जाणार आहे.

या दोन्हीं घटना पोलीस कर्मचाऱ्यांशी संबंधित घडल्या असून त्यांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले आहे. याची दखल पोलीस अधिक्षक राजेंद्र माने यांनी घेतली आणि या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. शिवाय ग्राहकांनी एटीएम मशीनमध्ये सावधगिरी बाळगावी, असं आहवान ही पोलीसांच्यावतीने करण्यात आल आहे.