कोल्हापूर : कोल्हापूरची विमानसेवा सतत बंद पडत असल्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीने विमानतळाच्या जागेची शांती करून अनोखं आंदोलन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उडान योजनेमार्फत मुंबई कोल्हापूर ही विमानसेवा सुरू करण्यात आली होती, मात्र ही विमानसेवा मधेच खंडित झाली आहे.

यानंतर एक नोव्हेंबरपासून हैदराबाद - कोल्हापूर, कोल्हापूर- बंगळूर ही विमानसेवा सुरू होणार होती, मात्र या सेवेतही अडचणी येऊन ही विमानसेवा रद्द झाली आहे .

कोल्हापूर विमानतळाच्या जागेवरच बाधा झाली असावी त्यामुळेच इथं विमान सेवा सुरळीत होत नाही म्हणून आज शिवसेनेच्या वतीने विमानतळाच्या जागेवर शांती करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने शांती होम आणि तांत्रिकाच्या माध्यमाने अघोरी पद्धतीचा यज्ञ करण्यात आला.

कोल्हापूरच विमानतळ देशभरात चेष्टेच विषय बनला आहे. उद्योग धंदे वाढले पाहिजे, येथील व्यावसाय वाढला पाहिजे यासाठी विमानसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र कोल्हापूरच्या स्थानिक प्रतिनिधीच्यां दुर्लक्षामुळे वारंवार विमानसेवा खंडित होत आहे. मग विमानसेवा सुरळीत का होत नाही? म्हणून आम्हा शिवसैनिकांना वाटल की विमानतळाच्या जागेत काहीतरी बाधा आहे. त्यामुळे ही बाधा दुर व्हावी म्हणून तांत्रिक आणुन आम्ही या जागेची शांती केली, असं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले.

कोल्हापूरची विमानसेवा गेल्या 6 वर्षांपासून रखडली होती. अनेक वेळा या विमानसेवेच्या घोषणा झाल्या आणि त्या हवेतच विरल्या. मात्र कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी या सेवेसाठी मोठा पाठपुरावा केला होता. मात्र ह्या सेवा सुरू झाल्याच्या काही महिन्यातच बंद पडल्या आहेत.