सोलापूर : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याची धमकी देणारा पोलीस कर्मचारी बेपत्ता झाल्यामुळे पंढरपूरमध्ये खळबळ उडाली आहे. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात काम करणारा कर्मचारी राहूल जगताप याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट अपलोड केली होती. त्यामध्ये त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळलो आहे, असे सांगत अत्महत्येची धमकी दिली होती. आता राहुल गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्यामुळे त्याचे कुटुंबीय चिंतेत आहेत.


अनेकदा पोलीस खात्यात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचारी स्वतःची बदली करुन घेतात. परंतु काही वेळा कर्मचारी टोकाची भूमिकादेखील घेतात. अशीच घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व एक कर्मचारी वारंवार त्रास देत असून त्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे धमकीपत्र कॉन्स्टेबल राहुल जगताप याने सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

धमकीपत्र व्हायरल झाल्यानंतर राहुल गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंबीय आणि पोलीस विभागाने त्याचा शोध सुरु केला आहे. परंतु राहुलला शोधण्यात पोलीस आणि त्याचे कुटुंबीय अपयशी ठरत आहेत.

दरम्यान जगताप याचा शोध सुरु असून तो सापडल्यावर त्याच्याकडून माहिती घेऊन अहवाल गृहविभागाला दिला जाणार असून यात जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक डॉ. Pसागर कवाडे यांनी सांगितले आहे .