परभणीत पोलिसाकडून रागाच्या भरात 7 जणांवर चाकूहल्ला
एबीपी माझा वेब टीम | 29 Jan 2017 07:54 PM (IST)
परभणी : पोलिसाने रागाच्या भरात सात जणांवर चाकू हल्ला केला. परभणी शहरातील धनूबाई प्लॉट परिसरात ही खळबळजनक घटना घडली. जखमींमध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. धनूबाई प्लॉट परिसरात एका कोपऱ्यावर काही मुलं उभी होती. तुम्ही माझ्याकडेच का बघताय, असं म्हणत पोलिस कर्मचारी अंजना रास्कटलाने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हस्तक्षेप करणाऱ्यालाही पोलिस कर्मचाऱ्याने मारहाण केली. प्रकरण अधिक गंभीर होत असल्याचे लक्षात आल्याने आजूबाजूच्या लोकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस कर्मचाऱ्याने चाकू काढत लोकांवर वार करायला सुरुवात केली. यामध्ये सात जण जखमी झाले. अंजना रास्कटला हा पोलिस कर्मचारी या भागातील नागरिकांना त्रास देतो, असा रहिवाशांचा आरोप आहे. दरम्यान, सातही जखमींना परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर एक जण अधिक गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी नांदेडमध्ये हलवण्यात आल्याची माहिती मिळते आहे.