पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन करणार आहेत. भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार आहेत.


दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाआधीच काँग्रेसने, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं भूमीपूजन उरकून घेतलं. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक नेते यावेळी हजर होते.

आधी नागपूर मेट्रोचं भूमिपूजन का?

दरम्यान, भाजपने पुणे मेट्रोआधी नागपूर मेट्रोचं भूमिपूजन का केलं असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं भूमीपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मात्र महापालिकेने पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्याचं ठरवलं असताना मोदींच्या हस्ते उद्घाटन का, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.

पुणे मेट्रोचं भूमिपूजन शरद पवारांच्या हस्ते व्हावं, असा ठराव महापालिकेत काँग्रेसच्या पाठिंब्यानेच मंजूर करण्यात आला होता. मात्र पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी भाजपसोबत दिलजमाई केली. या निर्णयावरुन यू टर्न घेत शरद पवार केवळ कार्यक्रमाला उपस्थित असतील, यावरच सहमती दर्शवली, असा आरोप रमेश बागवे यांनी केला आहे.

भाजप-राष्ट्रवादीचा वाद

पुणे मेट्रो भूमिपूजनवरुन राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद सध्या निवळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर राष्ट्रवादीने एक पाऊल मागे घेतलं. त्यामुळे 23 डिसेंबरचा पुणे मेट्रो भूमिपूजनाचा प्रस्तावित कार्यक्रम रद्द करत असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं. शरद पवारांना 24 तारखेच्या कार्यक्रमाला न बोलावल्यास राष्ट्रवादी काँग्रेस 23 तारखेला संध्याकाळी मेट्रोचं भूमिपूजन करणार, असा इशाराही पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी दिला होता.

पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी पिंपरीत बॉम्बसदृश्य वस्तू

पुण्यात मेट्रोच्या भूमिपूजनाला अवघे काही तास शिल्लक असताना, तिथून काही किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या पिंपरी येथे बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे काही तासांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहाणार आहेत. विश्वनाथ साळुंखे नावाच्या व्याक्तीकडे ही स्फोटके आढळून आली आहेत. या वस्तू कमी तीव्रतेच्या असल्या तरीही एखाद्याच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या आहेत.

संबंधित बातम्या


मोदींआधीच काँग्रेसकडून पुणे मेट्रोचं भूमिपूजन संपन्न!


पुणे मेट्रोचं भूमीपूजन पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते करणार : काँग्रेस


पुणे मेट्रोचं मोदींच्या दौऱ्यापूर्वीच भूमीपूजन करणार, राष्ट्रवादीचा इशारा


पवार-मोदी 24 डिसेंबरला व्यासपीठावर एकत्र येणार!