PM Narendra Modi Pune Visit Eknath shinde :   पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे जगभरातले लोक महत्वाचा नेता म्हणून पाहतात ही अभिमानाची गोष्ट आहे, असं म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोदींचं भरभरुन कौतुक केलं.  पुण्यात (Pune News) नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak Award 2023) प्रदान करण्यात येत आहे. याच सोहळ्यात शिंदेंनी मोदींच्या कार्याचा पाढा वाचला आणि त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, हा पुरस्कार यापूर्वी अनेकांना दिला गेला आहे. ज्यांनी समाजामध्ये चांगलं काम केलं त्यांना आजपर्यंत देण्यात आला आहे. शरद पवारांना देखील हा पुरस्कार देण्यात आला आहे. जगात प्रसिद्ध असलेल्या मोदींना हा पुरस्कार देत आहे. त्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो आणि टिळक स्मारक ट्रस्ट यांचे अभार मानतो.


मोदींनी देशाचं सूत्र हाती घेतलं आणि 'सबका साथ आणि सबका विकास'चा नारा दिला आहे. पुरस्कार त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. जगात मोदींचं नाव आदरानं घेतलं जातं. कोणी ऑटोग्राफर घेतात, फोटो काढतात आणि जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती त्यांना ग्लोबली पॉवरफुल्ल म्हणतात. तेव्हा अभिमानाने छाती फुलते, असं म्हणत त्यांनी मोदींचं कौतुक केलं. 


भारताला आत्मनिर्भर करण्याचा नारा देत अनेकांना आत्मनिर्भर होण्यास मदत केली. 'योग्य रस्ता येण्याची वाट बघण्यात दिवस घालवतो. मात्र आपल्याला याचा विसर पडतो की, रस्ते हे वाट बघण्यासाठी नाही तर चालण्यासाठी असतात', असं लोकमान्य टिळक म्हणाले होते. त्यामुळे मोदींनी हाच उपदेश आत्मसात केला आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम ते करत असल्याचं शिंदे म्हणाले.