पंतप्रधान 16 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर, महिला बचत गटाच्या मेळाव्याला राहणार उपस्थित
एबीपी माझा वेब टीम | 11 Feb 2019 07:16 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये महिला बचत गटाच्या मेळाव्याला उपस्थित राहणार असून त्याठिकाणी ते सभाही घेणार आहेत.
यवतमाळ : आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा सुरुच आहे. पुढच्या आठवड्यात मोदी यवतमाळ दौऱ्यावर येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी दिली. पंतप्रधान मोदी येत्या शनिवारी म्हणजेच 16 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये येणार आहेत. यावेळी ते पांढरकवडाला भेट देणार आहेत. महिला बचत गटाच्या मेळाव्याला मोदी उपस्थित राहणार असून त्याठिकाणी ते सभाही घेणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यात महिला बचत गटाचं मोठं जाळं आहे. 17 हजारापेक्षा जास्त बचत गट चांगलं कार्य करत असून या सर्व महिलांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी मोदी पांढरकवड्याला येणार आहेत. 16 फेब्रुवारीला सकाळी 10.30 वाजता नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये दाखल होतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी पत्रकार परिषदेत दिली.