Narendra Modi on Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील दौरा निश्चित झाला आहे. 28 फेब्रुवारीला पंतप्रधान यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी  (PM Modi) हे दोन लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधीत करणार आहे. या मेळाव्यासाठी भारी परिसरात सुमारे 45 एकर जागेत या मेळाव्याची जय्यत तयारी केली जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणा या मेळाव्याच्या तयारीला लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 30 विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदी हे चौथ्यांदा यवतमाळ जिल्हासह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यानिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही केंद्रीय मंत्री देखील दौऱ्याच्या आदल्या दिवशीच, 27 फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


दोन लाखांहून अधिक महिलांना करणार संबोधित


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्यातील भारी शिवार येथे येणार असल्याने त्या अनुषंगाने मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागाचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, प्रधान सचिव, अवर मुख्य सचिव यांनी आढावा सभा घेतली. या सभेला पालकमंत्री संजय राठोड, अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक, विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, भाजपचे आमदार यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी पत्की यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सभेत सहभागी झाले. नियोजनाच्या दृष्टीने विविध 30 समित्या गठित करण्यात आल्या असून या मेळाव्याच्या तयारीला वेग आला आहे. शहरापासून 5 किमी अंतरावर असलेल्या भारी गावाजवळ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. साधारणपणे 45 एकरच्या विस्तीर्ण जागेवर ही सभा घेतली जाणार आहे. त्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे. जेसीबी मशीनने या जागेच्या सपाटीकरण सुरू आहे. 7 हेलिपॅडची निर्मिती जवळच असलेल्या विमानतळावर केली जात आहे. शिवाय विशेष रस्ता सुद्धा पंतप्रधान मोदींच्या आगमनासाठी तयार करण्यात येत आहे.


मागील महिन्यातही पंतप्रधान आले होते महाराष्ट्र दौऱ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिन्यातही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. आगामी निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक, मुंबई आणि सोलापूर येथे दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. मुंबईमध्ये अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. यावेळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आलं होतं. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक इथं आयोजित 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवालाही हजर राहिले होते. त्यानंतर पंतप्रधान  सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते 15 हजार घरकुलांचं लोकार्पण करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी हे चौथ्यांदा महाराष्ट्र सोबतच यवतमाळच्या देखील  चौथ्यांदा दौऱ्यावर येत आहेत. 


पंतप्रधान चौथ्यांदा यवतमाळ दौऱ्यावर


पंतप्रधान मोदी हे चौथ्यांदा यवतमाळ जिल्हाच्या दौऱ्यावर येत आहेत. 2004  मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते यवतमाळला आले होते. त्यांची जाहीर सभा पोस्टल ग्राउंडवर झाली होती. यानंतर 20 मार्च 2014 ला लोकसभा निवडणुकीपूर्वी आर्णीजवळ असलेल्या दाभडी येथे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आले होते. त्यावेळी त्यांनी ‘चाय पे चर्चा’तून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी 16 फेब्रुवारी 2019  रोजी यवतमाळच्या पांढरकवडा येथे महिला बचत गटाच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी देखील ते आले होते. आता पुन्हा पंतप्रधान मोदी हे यवतमाळ येथे येत असल्याने महाराष्ट्र आणि यवतमाळ येथे येण्याची ही पंतप्रधानांची चौथी वेळ आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या