सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूरच्या दौऱ्यावर असून 85 मिनिटांत सहा विकासकार्यांचा शुभारंभ ते करणार आहेत. देहू-आळंदी पालखी मार्ग, 30 हजार घरकुलांची पायाभरणी, स्मार्ट सिटी, ड्रेनेज योजना अशा विविध विकासकामांचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. सभेच्या माध्यमातून मोदी लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकण्याची चिन्हं आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते दळणवळण मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण विकास मंत्री हरजितसिंग गिरी सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. याशिवाय केंद्र आणि राज्यातील विविध वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 10 वाजून 50 मिनिटांनी पंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टरने बिदरहून सोलापूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर पार्क स्टेडियममध्ये इलेक्ट्रॉनिक बटण दाबून पंतप्रधान मोदी सहा विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करतील. त्यानंतर ते उपस्थितांशी संवादही साधणार आहेत. दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी सोलापूर विमानतळावरुन हेलिकॉप्टरने बिदरकडे रवाना होतील.
कोणकोणत्या विकासकामांचं भूमिपूजन?
उजनी ते सोलापूर या 360 कोटी रुपये खर्चून साकारण्यात येणाऱ्या समांतर जलवाहिनीचं भूमिपूजन
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एबीडी एरियातील 190 कोटीच्या पाणीपुरवठा ड्रेनेज लाईन सुविधा कामाचं भूमिपूजन
हद्दवाढ भागात महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या अमृत योजनेअंतर्गत 180 कोटींच्या भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन
महापालिकेच्या वतीने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेल्या तीन एसटीपी प्रकल्पाचे लोकार्पण
पंतप्रधान आवास योजनेतून रे नगर फेडरेशन या नियोजित 30 हजार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन
सोलापूर-उस्मानाबाद या चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण
सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्पेशल पोलिस गार्ड (एसपीजी) च्या 25 टीम्स सोलापुरात दाखल झाल्या आहेत. 500 जण आणि 30 संघटनांना नोटीस बजावण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा शासकीय असून अनुचित प्रकार टाळण्याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, काळे झेंडे दाखवून सोलापूर शहर आणि राज्याचे नाव देशात बदनाम होईल अशी वर्तणूक करु नये, सुरक्षेसाठी महिलांनी पर्स, पाण्याची बाटली, बॅग सोबत कार्यक्रम स्थळी आणू नये, पिण्याच्या पाण्याची आयोजक सोय करतील, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत.
मोदींचा सोलापूर दौरा, 85 मिनिटांत सहा विकासकार्यांचा शुभारंभ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Jan 2019 08:50 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरातील पार्क स्टेडियममध्ये इलेक्ट्रॉनिक बटण दाबून सहा विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करतील. त्यानंतर ते उपस्थितांशी संवादही साधणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -