मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा एखाद्या मतदारसंघात आयोजित करण्यापूर्वीही भाजपकडून त्याची खूप तयारी आणि अभ्यास केला जातो. नरेंद्र मोदी ज्या ठिकाणी सभा घेतात त्या ठिकाणी उमदेवार सहज जिंकूनही येतात. पण यावेळी मात्र नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊनही राज्यातील विद्यमान आमदार पंकजा मुंडे आणि उदयनराजे भोसले यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे भाजपची निवडणूक रणनितीही इथे अपयशी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुंकापूर्वी पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी दोन्ही मतदारसंघात जाऊन जाहीर सभा घेतल्या होत्या. परळीमध्ये त्यांनी पंकजा मुंडे आणि बीडमधील इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली आणि नंतर साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि विधानसभेच्या इतर उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली होती. या सभेमध्ये त्यांनी उदयनराजे भोसले यांना निवडून देण्याचे आवाहनही साताऱ्याच्या जनतेला केले होते. पण या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार धक्कादायकपणे पराभूत झाले आहेत.


परळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आणि दसरा मेळाव्यानिमित्त झालेली गृहमंत्री अमित शाह यांची प्रचारसभा यांचाही विशेष परिणाम मतदारांवर झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यमान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु, धनंजय मुंडेंनी विजय मिळवत देत पंकजा मुंडेंना जोरदार धक्का दिला आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पराभूत झाल्या. त्यांना त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी पराभूत केले. ३० हजारांच्या मताधिक्याने धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना हरविले. धनंजय मुंडे यांचा हा विजय जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम करणारा आहे.

तर दुसरीकडे सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने साताऱ्यातील जनतेने उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. साताऱ्यात उदयनराजेंची लोकप्रियता तुफान आहे. ते कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढले तरी त्यांचा विजय निश्चित असतोच, असं कायम म्हटलं जातं. परंतु हा समज पोटनिवडणुकीत चुकीचा ठरला आहे.