मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये भाजप शिवसेना युतीला गेल्यावेळच्या तुलनेत कमी जागांवर यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. भाजपच्या सगळ्या अडचणी मी समजून घेऊ शकत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. ठाकरे म्हणाले की, निवडणूक म्हटलं की हार जीत होतंच असते. युतीचे सरकार स्थापन होऊ शकेल एवढ्या जागा जनतेने दिल्या आहेत. जनतेने जागरूकतेने मतदान करत सर्वच पक्षांना जमिनीवर पाय ठेवण्याचे काम केले आहे, असेही ठाकरे म्हणाले.


सर्वच पक्षाचे डोळे उघडणारा हा जनादेश आहे. जनतेने ज्या अपेक्षेनं आम्हाला आशीर्वाद दिलाय, त्या अपेक्षेवर काम करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

ठाकरे म्हणाले की, जागावाटपाच्या वेळी भाजपच्या अडचणी समजून घेऊन मी कमी जागा स्वीकारल्या आहेत. पण त्यांच्या अडचणीत वाढ होत असेल. तर मी सगळ्या अडचणी समजून घेऊन शकत नाही. आता अत्यंत पारदर्शकपणे आता दिल्लीच्या नेत्यांशी चर्चा करू. अमित शाह येतील मग आम्ही चर्चा करू, असेही ठाकरे म्हणाले.

जेंव्हा राज्यकर्त्यांचे डोळे बंद होतात तेव्हा जनता डोळ्यात अंजन टाकते. सगळ्यांचे डोळे उघडले म्हणून त्याचे आभार मानतो, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी ५० - ५० च्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली.  फॉर्म्युल्यावर निर्णय झाल्यावरच सरकार स्थापनेचा दावा करण्यात येईल. सत्ता स्थापनेची घाई नाही मात्र सर्व पर्याय खुले आहेत असेही ते म्हणले.. हा इशारा वगैरे नाही, पण जे ठरलं होतं त्याची आठवण करून नक्की देणार आहे, असे ते म्हणाले.  सत्तेची हाव माझ्या डोक्यात नाही, असेही ते म्हणाले.

पक्ष बदलणाऱ्यांना पराभूत केलं हे सगळ्यात मोठं काम जनतेने काम केलं आहे, असेही ते म्हणाले. यावेळी आदित्यच्या विजयाबाबत बोलताना ते म्हणाले की, आईवडील म्हणून आम्हाला आदित्यचा अभिमान आहे. मी यासाठी जनतेसमोर नतमस्तक होतो. हे आशीर्वाद कायम असू द्यात, असेही ते म्हणाले.

यावेळी विरोधी पक्षांवर बोलताना ते म्हणाले की, गेले पाच वर्ष झोपले होते तसे आता झोपू नका, दुसऱ्याचे चांगले झाले म्हणून मला वाईट वाटत नाही, असेही ते म्हणाले.