देहू : देहूतील जगतगुरू संत तुकाराम महाराजांचं मंदिर उद्यापासून दर्शनासाठी बंद राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी देहूमध्ये येणार आहेत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. केंद्रीय सुरक्षा पथकानं केलेल्या सूचनेनंतर उद्यापासून तुकाराम महाराजांचं मंदिर बंद राहणार आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिळा मंदिर, तुकोबांच्या मूर्तीच लोकार्पण होणार आहे. त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीने रविवारी 12 जून सकाळी 8 ते 14 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मंदिर बंद असणार आहे. रोज वीस ते पंचवीस हजार भाविक दर्शनासाठी येतात तर सुट्टीच्या दिवशी हा आकडा वाढतो, अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी दिली आहे.


"तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण माझ्या हस्ते झालं तर मी माझं भाग्यच समजेन," असं मोदी म्हणाले होते. तुकोबांची शिकवण घेऊन आतापर्यंत या पिढ्यांनी सुरु ठेवलेलं संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पिढ्यांचे कार्य समाजहिताचं आहे. याची कल्पना मोदींना होतीच कारण या आधी 'मन की बात' मध्ये आषाढी पायी वारीचा उल्लेख केला होता. यावरुनच मोदींची वारकरी संप्रदायाबद्दलची भावना सर्वांसमोर आली होती. त्यानंतर देहू संस्थानाने  पंतप्रधान नरेंद्रमोदी ज्या लोकार्पण सोहळ्यासाठी आमंत्रण दिले  होते. 


तर दुसरीकडे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर वज्रलेपन करण्यात येणार आहे. आज रात्री मूर्तीच्या पायावर तीन तास ही लेपन प्रक्रिया चालणार आहे. यामुळे रविवारी पूर्ण दिवस रुक्मिणी मातेचं दुरुन दर्शन घ्यावं लागणार आहे. तसंच विठ्ठल मूर्तीची थोडी झीज झाली असून गरज वाटल्यास मूर्तीवरही लेपन करण्यात येणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाचे श्रीकांत मिश्रा यांनी ही माहिती दिलीय.