नागपूरः कोरोनाची तिसरी लाट जानेवारी महिन्यात आल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात ओसरली. त्यानंतर पहिल्यांदाच शनिवारी (ता. 11 जून) दैनंदिन बाधित संख्येची नोंद 50 पेक्षा जास्त झाली आहे. शनिवारी नागपूर जिल्ह्यात 55 नवीन बाधितांची नोंद झाली आहे. यासोबतच जिल्ह्यातील सक्रिय बाधित संख्या 154 वर पोहोचली आहे.


नागपूर शहरात शनिवारी 34 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यासोबत ग्रामीणमध्ये 19 बाधित आढळून आले. जिल्ह्याबाहेरील 2 बाधितांचीही नोंद आहे. वाढती बाधित संख्या ही धोक्याची घंटा असून प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनीही खबरदारी घ्यावी आणि थोडीही लक्षणे आढळल्यास तपासणी करावी असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.


दोन रुग्ण पोहोचले रुग्णालयात


शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांपैकी 2 रुग्णांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यापूर्वी 27 फेब्रुवारी 2022 रोजी 58 रुग्णांची नोंद झाली होती. यानंतर मार्च महिन्यात 37, एप्रिल महिन्यात पाचच्या आत तर मे महिन्यात 10च्या आत बाधितांची नोंद झाली होती. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.


प्रवाशांमुळे वाढला धोका


महाराष्ट्रात मुंबईत रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र मुंबईत ते नागपूर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची रेल्वे स्थानकावर तपासणी केली जात नाही आहे. शिवाय रेल्वे स्थानक आणि बसनेही येणाऱ्यांचे कुठलेही चाचणी होत नसल्याने शहरात कोरोना वाढीसाठी प्रवासी कारणीभूत ठरु शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


खबरदारी घ्या!


शहरातील बाधितांची संख्या लक्षात घेता नागरिकांनीही स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, थोडीही लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी करावी. तसेच ज्यांचे लसीकरण बाकी आहे त्यांनी दोन्ही डोस पूर्ण करावे, आणि बुस्टर डोससाठी पात्र असणाऱ्यांनी बुस्टर डोस घ्यावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 2701 रुग्णांची नोंद तर 1327 रुग्ण कोरोनामुक्त


Nagpur: अखेर मनपाला आली जाग; बाधितांची संख्या वाढल्यानंतर रेल्वे स्थानकावर अॅन्टीजेन चाचण्यांना सुरुवात