PM Modi on Ashok Chavan : देशातील विरोधकांमागे ईडी आणि सीबीआयचा ससेमीरा सुरू असतानाच देशातील विरोधी पक्षातील नेते सुद्धा एका मागोमाग एक या पद्धतीने भाजपमध्ये सामील होत आहेत. काहींची संस्थात्मक राजकारणासाठी राजकीय अगतिकता, तर काहींची राजकीय सोय यामागे पाहिली जात आहे. मात्र, यामुळे विचारधारा मात्र बासनात गुंडाळून ठेवावी लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशामध्ये ईडी आणि सीबीआयचे धाडसत्र सुरूच आहे. 


मोदी सरकारच्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळा


केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारकडून सातत्याने विरोधकांवर भ्रष्टाचाराचा आणि घराणेशाहीचा आरोप केला जातो. मात्र, त्याच आरोपातील नेते मागच्या दाराने भाजपमध्ये सामील होतात, हे गेल्या काही दिवसांपासून ठळकपणे दिसून येत आहे. काँग्रेस प्रणित युपीएच्या कार्यकाळातील कामकाजावर मोदी सरकारकडून श्वेतपत्रिका सादर करण्यात आली. या श्वेत पत्रिकेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गाजलेल्या आदर्श घोटाळ्याचा सुद्धा समावेश होता. मात्र, आता त्याच आदर्श घोटाळ्यातील मुख्य आरोपी म्हणून पाहिले गेले तेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण राजीनामा देताच भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. 






मोदींकडून अशोक चव्हाणांवर टीका 


मात्र, तेच अशोक चव्हाण यांचं नाव आदर्श घोटाळ्यात आले त्यावेळी त्यांच्यावर आरोपांची राळ उडवून देण्यात पंतप्रधान मोदींपासून ते राज्यातील भाजप नेतृत्वाने कोणतीही कसर बाकी ठेवली नव्हती. इतकंच नव्हे तर आता 2014 मध्ये पीएम मोदी यांनी केलेले ट्विट सुद्धा आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 


9 एप्रिल 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाण यांच्या अनुषंगाने ट्विट करत जोरदार टीका केली होती. अशोक चव्हाण सारख्या घर चोरणाऱ्यांना आपण चौकीदार करणार का? अशी विचारणा त्यांनी सार्वजनिकरित्या केली होती. आता हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालं आहे. आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते भाजपवासी होऊन त्यांना केंद्रामध्ये मोठं मंत्रिपद दिलं जाईल, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता एका बाजूने आरोप करायचे आणि दुसऱ्या बाजूने मागचं दार उघड ठेवून त्यांनाच भाजपमध्ये सामील करून घ्यायचं असा आरोप विरोधकांकडून होत आहे. याची चर्चा आता सोशल मीडियामध्ये रंगली आहे.


मोदींनी आरोप करताच अजित पवारांनी कलटी मारली


दुसरीकडे, छत्तीसगडच्या प्रचार सभेत पंतप्रधान मोदींनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला. त्यानंतर काहीच दिवसात अजित पवारांनी भाजपला साथ दिली. आता श्वेतपत्रिका येऊन काहीच दिवस झाले आहेत आणि अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. 


काय आहे आदर्श प्रकरण? 


अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असताना आदर्श घोटाळा उघड झाला होता. कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याचा चव्हाणांवर आरोप झाला होता. त्यामुळे त्यांना 2010 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. 


काँग्रेसमधून आमदारकीचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राजीनामा दिला याला काही कारण नाही, सगळंच काही सांगता येणार नाही, बरीच वर्षे काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर आता मला वेगळा पर्याय शोधावा असं वाटलं. त्यामुळे हा राजीनामा दिल्याचं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.