अमरावती : अमरावतीच्या मेळघाटमधील आदिवासी महिलांनी तयार केलेल्या राख्या त्यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातावर बांधल्या. धारणी तालुक्यातील लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राच्या वतीने बांबूपासून राख्या तयार करण्यात येतात.
दरवर्षी येथील बांबू राखीला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो. महाराष्ट्रासह देशाबाहेर सुद्धा या बांबू राख्यांची विक्री होत आहे. यावर्षी तर तब्बल 37 देशात ही बांबूची राखी पोहचली आहे. त्यामुळेच या बांबू केंद्राला थेट पंतप्रधान कार्यालयातून आमंत्रण आलं होते.
या केंद्रातून चार महिलांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात राखी बांधली. याठिकाणी बांबू केंद्राच्यावतीने गेल्या काही वर्ष बांबूच्या वस्तुंमध्ये निरनिराळे प्रयोग करण्यात येत आहेत.
याशिवाय मोदींनी पंतप्रधान निवासस्थानामध्ये चिमुकल्या मुलींसोबतही रक्षाबंधन साजरं केलं. यावेळी दिल्लीतल्या विविध शाळेतील मुलींनी मोदींना बांधलेल्या राख्यांनी मोदींचा हात अक्षरशा राख्यांनी भरून गेला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देखील चिमुकल्या मुलींनी राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं.