PM and CM Relief Fund : नेरुळमधील ‘आनंद वृद्धाश्रम’मध्ये राहणारे 82 वर्षीय सदानंद करंदीकर (Sadanand Karandikar) यांनी तब्बल 20 लाखांची देणगी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला (PM and CM Relief Fund ) दिली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये त्यांच्या पत्नीचं कर्करोगाने निधन झालं होतं. कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांची धावपळ आणि पैशाअभावी धडपड त्यांनी जवळून पाहिली आहे. त्यामुळे पत्नीच्या स्मरणार्थ त्यांनी देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

सदानंद करंदीकर हे मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा गावचे रहिवासी आहेत. खासगी कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नी सुमती करंदीकर यांच्यासह नेरुळ येथील 'आनंद वृद्धाश्रम' मध्ये वास्तव्यास सुरूवात केली. सुमती करंदीकर या शासकीय सेवेतून निवृत्त झाल्या होत्या. करंदीकर दाम्पत्याला अपत्य नव्हते. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुमती करंदीकर यांचे कर्करोगामुळे निधन झाले. 

पत्नीच्या आजारपणात आणि उपचारादरम्यान सदानंद करंदीकर यांनी इतर कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ आणि पैशासाठीची तगमग जवळून पाहिली. त्या अनुभवांनी ते हेलावून गेले. यामुळे त्यांनी पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ काहीतरी कार्य करण्याचा निर्धार केला होता. अध्यात्म, देवभक्ती आणि शेतीत रस असलेले करंदीकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 लाख रुपये आणि पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 10 लाख रुपये, अशी एकूण 20 लाख रुपयांची देणगी दिली आहे. त्यांनी स्वतः डोंबिवली येथून सकाळी लोकलने प्रवास करत, नंतर बसने मंत्रालय गाठले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे हा मदतीचा धनादेश सुपूर्त केला. सध्या करंदीकर हे आपल्या बहिणी प्रभा श्रीराम शितूत यांच्याकडे राहतात. त्यांच्या या अतुलनीय कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांनी उभा केलेला सेवाभाव आणि त्याग आजच्या समाजासाठी एक आदर्श ठरत आहे.

सदानंद करंदीकर यांचं कार्य प्रेरणादायी : देवेंद्र फडणवीस 

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले आहे की, दुःखातून निर्माण होणार्‍या करुणेचे मूर्तीमंत उदाहरण! 82 वर्षांचे सदानंद विष्णु करंदीकरजी आपल्या पत्नी सुमती करंदीकर यांच्यासह सेवा निवृत्त झाल्यानंतर अपत्य नसल्याने नेरुळमधील आनंद वृद्धाश्रमात राहायला गेले. मात्र, मागील वर्षी सुमती करंदीकर यांचे कर्करोगाने निधन झाले. यादरम्यान कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांची धावपळ आणि पैशाअभावी होणारी धडपड करंदीकरजी यांनी जवळून पाहिली.

त्यामुळे आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ त्यांनी कर्करोगग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी ₹10 लाख, अशा एकूण ₹20 लाखांच्या देणगीचा धनादेश दिला. एकीकडे दुःखातून वेदना आणि नैराश्याची भावना निर्माण होणारी असंख्य उदाहरणे असताना दुःखातून करुणेच्या निर्मितीचे हे मूर्तीमंत उदाहरण... सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व असलेले सदानंद विष्णु करंदीकरजी यांचे हे मानवतेचा शिखरबिंदू ठरणारे कार्य आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी राहील, असे त्यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा

Maharashtra Rain Updates Today: मुंबई, कोकणसह राज्यभरात पुढील 2 दिवस जोरदार पाऊस कोसळणार; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट