लोअर परेलच्या फिनीक्स मॉलमध्ये महापालिकेने धडक कारवाई केली. दिवसभर दंड न आकारता केवळ प्लास्टिक जमा करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लोअर परेलच्या मॉलमधील सिलेरीया, स्टार बक्स, फुड मॉल, मॅकडोनल्ड यांच्यावर धडक कारवाई केली.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंदी असलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले.
सिलेरीया, स्टार बक्स, फुड मॉल यांना प्रत्येकी 5000 रुपयांचा दंड आकारण्यात आला, तर मॅकडोनल्डने दंड देण्यास नकार दिल्याने प्रशासन त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे. मार्केट विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांनी ही कारवाई केली.
सांगलीत प्लास्टिकचं एक टन साहित्य जप्त
सांगलीतही प्लास्टिक बाळगणाऱ्या दुकानावर महापालिकेने छापे टाकून हजारो रुपयांचा प्लास्टिक आणि थर्माकोलचा साठा हस्तगत करून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. महापालिकेने आपल्या 15 भरारी पथकाच्या माध्यमातून आज जवळपास 50 हजार रुपये दंड वसूल केला, तर अंदाजे एक टन प्लास्टिक पिशवी आणि अन्य प्लास्टिक जप्त केलं आहे.
यामध्ये सांगली शहरात मुख्य बाजार पेठेत छापे टाकून अनेक दुकानातून प्लास्टिक तसेच थर्माकोलचे साठे जप्त करण्यात आले आहेत. प्लास्टिक विरोधी कारवाई उद्यापासून अधिक तीव्र होणार असून मंगल कार्यालये, मटण आणि चिकन मार्केट, मंडई, बाजार येथेही तपासणी करण्यात येणार आहे.
राज्यातील महापालिका आणि दंडवसुली
- अकोला महानगरपालिका : पहिल्या दिवशी तेलीपुरा चौकात प्लास्टिकविरोधात एक कारवाई केली. यात दुकान मालकाला तीन हजारांचा दंड करण्यात आला.
- अमरावती महानगरपालिका : शहरात दोन ठिकाणी छापा मारण्यात आला. यामध्ये 100 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं असून एकूण 15 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
- अहमदनगर महानगरपालिका : महापालिकेची प्लास्टिकविरोधी कारवाई कासवगतीने, पाच वाजेपर्यंत शहरात फक्त दोघांवर कारवाई, प्रत्येकी पाच हजारानुसार दोघांकडून दहा हजारांचा दंड वसूल
- उल्हासनगर महानगरपालिका : 21 जणांवर कारवाई करत एक लाख 10 हजार रुपये दंड वसुली करण्यात आली.
- औरंगाबाद महानगरपालिका : कोणतीही कारवाई नाही.
- कल्याण-डोंबिवली महानगरपालिका : 10 जणांवर कारवाई, 50 हजार दंडवसुली, 10 किलो प्लास्टिक जप्त
- कोल्हापूर महानगरपालिका : 4 जणांकडून 20 हजार रुपये दंड वसूल
- चंद्रपूर महानगरपालिका : 6 प्रतिष्ठानातून 100 किलो प्लास्टिक जप्त, एकूण 27 हजार रुपये दंड वसूल
- जळगाव महानगरपालिका : आज कारवाई नाही
- ठाणे महानगरपालिका : बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिकच्या 2500 किलो वस्तू जप्त करण्यात आल्या, तर 95 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
- धुळे महानगरपालिका : तीन प्लास्टिक विक्रेते आणि छोट्या व्यापाऱ्यांकडून साडे सोळा हजार रुपये दंड वसूल
- नवी मुंबई महानगरपालिका : सात जणांकडून 35 हजार रुपये दंड वसूल, 300 किलो प्लास्टिक जप्त
- नागपूर महानगरपालिका :
- नांदेड-वाघाळा महानगरपालिका : महापालिकेच्या सहा पथकांमार्फत शहरात तपासणी करण्यात आली. सकाळपासून चार कारवाया करत 20 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
- नाशिक महानगरपालिका : 72 जणांवर कारवाई, 350 किलो प्लास्टिक जप्त, 3 लाख 60 हजार रुपयांचा दंड वसूल
- पनवेल महानगरपालिका :
- परभणी महानगरपालिका :
- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका : सकाळपासून 15 दुकानांवर कारवाई करून 75 हजार दंड वसूल, 112 किलो प्लास्टिक जप्त
- पुणे महानगरपालिका : 73 जणांवर कारवाई करत तीन लाख 69 हजार रुपयांचा दंड वसूल, आठ हजार किलो कॅरी बॅग, थर्माकोल आणि ग्लास जप्त
- भिवंडी-निजामपूर महानगरपालिका : 40 हजार रुपयांची दंड वसुली झाली.
- मालेगाव महानगरपालिका : आज कारवाई नाही
- मीरा-भाईंदर महानगरपालिका : 20 हजार रुपयांचा दंड वसूल करत 90 किलो प्लास्टिक आणि 60 किलो थर्माकोल जमा
- बृहन्मुंबई महानगरपालिका : दिवसभर प्लास्टिक साहित्य जप्त करणाऱ्या महापालिकेने संध्याकाळच्या वेळेला लोअर परेलच्या फिनिक्स मॉलमध्ये छापा टाकत मोठी कारवाई केली.
- लातूर महानगरपालिका :
- वसई-विरार महानगरपालिका : आज कारवाई नाही
- सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका : 40 हजार रुपये दंड वसूल, अंदाजे एक टन प्लास्टिक पिशवी आणि अन्य प्लास्टिक जप्त
- सोलापूर महानगरपालिका : 43 दुकानांवर कारवाई करत 2 लाख 15 हजार रुपये वसूल करण्यात आले. शिवाय 600 किलो प्लास्टिकही जप्त करण्यात आलं.