बुलडाणा : पीककर्जासाठी बँक मॅनेजरने शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यात घडला आहे. महिलेच्या तक्रारीवरुन सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा मॅनेजर आणि शिपायाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या माहितीप्रमाणे, शेतकरी आणि त्याची पत्नी पीककर्जासाठी दाताळातल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्या. तिथं बँक मॅनेजरने कागदपत्रांची चाळणी करुन तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना केली. त्यावर संबंधित शेतकऱ्यानं त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. नंतर मॅनेजरने शेतकरी पत्नीसोबत अश्लील संभाषण करत त्यांना शरीरसुखाची मागणी केली.
मोबदल्यात पीककर्जासोबत वेगळं पॅकेजही देण्यात येईल, असा निरोप शिपायामार्फत महिलेला पाठवला. याप्रकरणी मॅनेजर आणि शिपाई या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
आरोपी बँक मॅनेजर
शेतकरी नेत्यांकडून निषेध व्यक्त
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. “एका राष्ट्रीयकृत बँकेचा मॅनेजर कुणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय असे करु शकत नाही. शिवाय, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन भाजप सत्तेत आलं, त्यांच्याच सत्तेत अशी घटना घडत असेल, तर त्यांना सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही, असे म्हणत रविकांत तुपकर यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच, या बँक मॅनेजरवर भाजप सरकार काय कारवाई करणार आहे”, याची माहिती द्यावी, अशी मागणीही तुपकरांनी केली आहे.