Pistol licenses : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गन कल्चर चांगलेच समोर आले होते. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया, भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे यांना शस्त्र परवाने वाटण्यात आल्याचा आरोप करत हल्लाबोल केला होता. यावरून आरोपांच्या फैरी झडल्या होत्या. आता बीड प्रशासनाने वराधीमागून घोडे नेत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 162 जणांचा पिस्तूल परवाना प्रशासनाकडून रद्द करण्यात आला आहे.
आवश्यक नसताना सुद्धा पिस्तूल परवाना
सर्वाधिक झटका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना बसला असून ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशांपैकी 140 जणांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, काही ठिकाणी परवानाधारकाचा मृत्यू होऊन सुद्धा त्यांच्या नावाचा परवाना असल्याचे दिसून आले. 20 परवाने या कारवाईमध्ये रद्द करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आवश्यक नसताना सुद्धा पिस्तूल परवाना दिल्याची धक्कादायक माहिती आता तपासामध्ये समोर आली आहे. अजूनही पिस्तूल परवानाधारकांची झाडझडती बीडमध्ये सुरूच आहे. बीडमध्ये जवळपास एक हजार 281 जणांना पिस्तूल परवाना देण्यात आले असून त्यामधील सर्वाधिक परळी तालुक्यामध्ये असल्याचा आरोप होत आहे. ज्यांच्यावर आतापर्यंत पिस्तूल परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे त्यामधील बहुतांक्ष राजकीय पक्षांच्या संबंधित लोक आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्येनंतर हवेत फैरी करणारे सुद्धा अडचणीत आले आहेत.
वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलिस कोठडी
दुसरीकडे, खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडवर मोका दाखल करण्यात आल्यानंतर सात दिवसांची एसआयटी कोठडी देण्यात आली. कराडला एसआयटीने बीड कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे, एकाही आरोपीने वाल्मीक कराडचं नाव घेतलेलं नाही, त्यामुळे खुनाच्या गुन्ह्यात कराडच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, असा प्रतिवाद कराडच्या वकिलांकडून करण्यात आला. कोर्टाने दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर वाल्मीकला 22 जानेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
इतर महत्वाच्या बातम्या