पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेचे कोव्हिड हॉस्पिटल चालविणाऱ्या स्पर्श संस्थेला घरचा रस्ता दाखविण्यात आलाय. ऑटो क्लस्टर कोव्हिड हॉस्पिटलमधील रुग्णांना सेवा देण्याचं कंत्राट त्यांना देण्यात आलं होतं. मात्र त्या फॉर्च्युन स्पर्श हेल्थकेअर संस्थेचे अनेक गैरप्रकार समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई न केल्यास शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला होता. 


त्यानंतर पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्पर्श संस्थेची उचलबांगडी केली. मोफत बेडसाठी एक लाख रुपयांची मागणी केल्याची बाब समोर आली होती. यावरून महापालिका सभागृहात तब्बल पाच तास वादळी चर्चा झाली. अनेक नगरसेवकांनी तोंड सुख घेतानाच, स्पर्श संस्थेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसा गुन्हा दाखल होताच, स्पर्शच्या दोन डॉक्टरांसह चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या. 


मग रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी एका वॉर्ड बॉयला अटक झाली. ही उजेडात आलेली दोन ताजी प्रकरणं तर याआधीच महापालिकेकडून बनावट बिलं देऊन लुबाडल्याची चौकशी ही सुरु आहे. बेडसाठी आकरलेले पैसे आणि रेमडेसिवीरचा काळाबाजार या प्रकरणात पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा आणखी प्रकरणं समोर येऊ लागली. 


एकामागे एक प्रकरणं समोर येत असल्याने कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये असंतोष वाढू लागला होता. ही बाब पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास येत आली होती. स्पर्शच्या सेवेवरून तोंडी तक्रारींचा तर भडीमारच सुरू होता. म्हणूनच पोलीस आयुक्तांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करत, स्पर्शवर कारवाईची मागणी केली होती. त्यालाच अनुसरून पालिका आयुक्तांनी स्पर्शला घरचा रस्ता दाखविला. त्यामुळे उद्यापासून महापालिका इथं सर्व रुग्णांना सेवा देणार आहे. स्पर्शच्या व्यवस्थापनाची इथून हकालपट्टी झाली असली तरी स्टाफ मात्र तसाच कार्यरत राहणार आहे. या स्टाफला महापालिकेकडे वर्ग करण्यात आलं आहे.