पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये सराफाच्या दुकानावर मार्च महिन्यात पडलेल्या दरोड्याचा वाकड पोलिसांनी 40 दिवसांनी छडा लावला आहे. एकेकाळी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाने सराफाच्या दुकानावर दरोडा घातल्याचं तपासात समोर आलं आहे. अनिल उर्फ छोटू धायल असं या उच्चशिक्षित तरुणाचं नाव असून तो मूळचा हरियाणाचा आहे.
काय आहे प्रकरण?
6 मार्च 2019 ला थेरगाव इथल्या पुणेकर ज्वेलर्समध्ये बंदुकीचा धाक दाखवून लूट झाली होती. विरोध केल्याने मालक दिव्यांक मेहता यांच्या पायावर गोळी झाडून तीन किलो सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. महत्त्वाचं म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रिसिव्हरही सोबत नेले होते. दोन चोरीच्या दुचाकीवरुन सहा चोरट्यांनी हा दरोडा टाकल्याचं तपासात निष्पन्न झालं. या प्रकरणी हरियाणातील सुभाष बिश्नोई तर राजस्थानच्या महिपाल जाट या दोघांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पण या दरोड्याचा सूत्रधार अनिलसह चार जण अजूनही फरार आहेत. सुभाषला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर दरोड्याच्या मूळ हेतूबाबत धक्कादायक माहिती समोर आली.
दरोड्याचं मूळ कारण काय?
अनिल हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी होता. 2013 मध्ये अनिल ऑस्ट्रेलियाला पुढील शिक्षणासाठी निघाला होता. त्याचा व्हिसाही तयार झाला होता. तेव्हाच हरियाणामधील महाविद्यालयाच्या बाहेर अनिल आणि त्याच्या मित्रांचे संदीप चाहर उर्फ सेठी टोळीशी वाद झाले. यामध्ये अनिलचा मित्र सुरेशची हत्या झाली. मग अनिलसह त्याच्या इतर मित्रांनी सुरेशच्या हत्येचा बदला घ्यायचं ठरवलं. यासाठी अनिलने ऑस्ट्रेलियाचा व्हिसा फाडून सेठीला संपवण्याचा चंग बांधला. सेठीची हत्या करायला गेले असता त्याचा मित्र किशोरी जाठ हाती लागला, मग त्याचीच हत्या केली.
या हत्येप्रकरणी अनिलला 2017 पर्यंत म्हणजेच चार वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातून बाहेर येताच त्याने गँगस्टर सेठीच्या हत्येचा कट रचला. हत्या करण्यासाठी पैसा आणि मनुष्यबळ हवं. पैसा असला की आपोआप मनुष्यबळ निर्माण होईल, म्हणून दरोडा टाकायचं ठरलं. त्यानुसार हा दरोडा टाकण्यात आला. पण वाकड पोलिसांनी दोघांना अटक केल्याने हा हत्येचा कट उधळला गेला.
पिंपरीमधील दरोड्याचा 40 दिवसांनी छडा, मित्राच्या हत्येचा बदला घेण्यासाठी उच्चशिक्षित तरुणाचं कृत्य
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Apr 2019 11:11 PM (IST)
हत्येप्रकरणी अनिलला 2017 पर्यंत म्हणजेच चार वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातून बाहेर येताच त्याने गँगस्टर सेठीच्या हत्येचा कट रचला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -