मुंबई: ज्येष्ठ समाजसेवक आणि पारधी समाजासाठी आयुष्य खर्ची घातलेल्या गिरीश प्रभुणे यांना पिंपरी चिंचवड मनपाने मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवली आहे. त्यांनी उभ्या केलेल्या गुरुकुलम या संस्थेचा एक कोटी 86 लाखांचा कर थकल्याने त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. गिरीश प्रभुणे यांना नुकतंच केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे.


एका हातात सन्मान आणि दुसऱ्या हातात जप्तीची नोटीस अशा काहीशा अवस्थेला गिरीश प्रभुणे यांना सामोरं जावं लागतंय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती आता भाजपची सत्ता आहे.


नुकतंच 25 जानेवारीला ज्येष्ठ समाजसेवक आणि पारधी समाजासाठी आयुष्य खर्ची घातलेल्या गिरीश प्रभुणे यांना केंद्रानं पद्मश्री जाहीर केला. तर दुसऱ्याच दिवशी निस्वार्थ भावनेनं पारधी समाजासाठी उभ्या केलेल्या गुरुकुलम आणि परिसराचा 1 कोटी 86 लाखाचा कर थकल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेनं त्यांना जप्तीची नोटीस बजावली आहे.


Padma Awards : महाराष्ट्रात सहाजणांना पद्म, रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण तर सिंधूताई, गिरीश प्रभुणेंसह पाच पद्मश्री


याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता मला याबाबत कोणतीही माहिती नाही, पिंपरी चिंचवडचे आयुक्त रजेवर गेले असल्यानं मी ते आल्यावर माहिती घेईल असं त्यांनी सांगितलं. मात्र कोणाला कोणताही पुरस्कार मिळाला तरी प्रत्येकाने आपलं रेकॉर्ड क्लिअर ठेवलं पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं. पत्रकार असो वा उपमुख्यमंत्री, आपण ज्या शहरात राहतो तिथले टॅक्स भरावे लागतात असंही ते म्हणाले. गिरीश प्रभुणे यांच्यावर अन्याय झाला असेल तर तो दूर केला जाईल आणि ही बातमी खरी असेल तर त्यांना याबाबत विनंती केली जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.


तर या प्रकरणी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांनी तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. तसेच गिरीश प्रभुणे यांना बजावण्यात आलेल्या करापैकी जो मुळचा कर आहे तो राज्य शासनाने माफ करावा यासाठीही प्रयत्न करणार असल्याचं उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या.


पहा व्हिडीओ: Girish Prabhune यांच्या गुरुकुलम संस्थेला पिंपरी चिंचवड पालिकेकडून जप्तीची नोटीस