पिंपरी चिंचवड: अवघ्या 32व्या वयात कोरोनाने तिच्या पतीला हिरावून नेले. दीड वर्षाच्या मुलाची जबाबदारी खांद्यावर येऊन पडली. अशा कठीण परिस्थितीतही तिनं समाजाच्या बुरसटलेल्या विचारांना छेद देणारं क्रांतिकारी पाऊल टाकलंय. सुवासिनींना घरी बोलावून या विधवा महिलेने हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम आयोजित केला आणि समाजासमोर एक आदर्श उदाहरण ठेवलं. 


पिंपरी चिंचवडमधील प्रीती आगळेचे पती दीपक आगळेना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हिरावून घेतलं. विधवा झालेल्या प्रितीने या कठीण प्रसंगातही समाजाला एक नवी दिशा दाखवली आहे. सुवासिनींना घरी बोलावून तिने हळदी कुंकूवाचा कार्यक्रम घेतला. विधवा झाली म्हणजे ती दु:खी असेल, ती लाचार असेल हा जो समाजाचा बुरसटलेला विचार आहे. हा विचारच तिने तो भेदून काढायचं ठरवलं. मी स्वतःच या विचाराने बरबटले तर समाज तरी मला कसा स्वीकारणार असं म्हणत आठ वर्षातील पती सोबतचे ते क्षण सोबतीला घेऊन ती ही क्रांती घडवत आहे.


प्रीती आगळेंचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं तेव्हा तिच्या वडिलांचं निधन झालं, आई विधवा झाल्या होत्या. त्यानंतरच्या पहिल्याच हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमामध्ये प्रितीने आईचं अतीव दुःख पाहिलं आणि त्या परंपरेला छेद देण्याचा तिने तेव्हाच निर्धार केला. पण भविष्यात तिच्याच नशिबी हा दिवस येईल, असा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. मात्र तो दिवस आला, ती डगमगली नाही आणि तिनं हे क्रांतिकारी पाऊल उचललं.


विधवा झालेल्या प्रीती दीड वर्षाच्या मुलाचा खंबीरपणे सांभाळ करतायत. अशा परिस्थितीत त्यांनी सुवासिनींना हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमाला बोलवण्याचा धाडसी निर्णय घेतला. कुटुंबियांनीदेखील समाजाचा विचार न करता त्यांच्या पाठीशी उभं रहायचं ठरवलं. प्रिती यांनी सुवासिन मैत्रिणी अन शेजाऱ्यांना आमंत्रण धाडलं. विशेष म्हणजे त्या सर्वांनी प्रीती यांना साथ दिली. 


परंपरा माणसांसाठी असतात की माणसं परंपरेसाठी हा विचार प्रीतीच्या बाबतीत कुटुंबीय, मैत्रिणींसह शेजाऱ्यांनी केला अन विधवा झालेल्या प्रीतीला या सर्वांनी सुवासिनीचं आयुष्य जगवायचा निर्धार केला. आता गरज आहे ती समाजाने याचं अनुकरण करण्याची, प्रत्येक विधवेला सुवासिनीचं आयुष्य देण्याची.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha