मुंबई : तेल कंपन्यांनी बैठकीसाठीही न बोलावल्याने राज्यातील पेट्रोलपंप चालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे येत्या रविवारपासून पेट्रोलपंपांना रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल, तर सोमवारपासून सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेतच पेट्रोलपंप चालू राहतील, असा इशारा पेट्रोलपंप चालकांनी दिला आहे.
पंप चालवण्यासाठी आवश्यक खर्च किती असावा आणि त्यांना दर सहा महिन्यांनी महागाई निर्देशांकानुसार वाढ देण्याचे लेखी आदेश केंद्र सरकारने अपूर्वाचंद्रा कमिटीद्वारे तेल कंपन्यांना दिले होते. मात्र त्याचं गेल्या चार वर्षांपासून पालन करण्यात आलेलं नाही. अनेकदा पत्रव्यवहार करुनही तेल कंपन्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, असा आरोप पेट्रोलपंप चालक संघटनांनी केला आहे.
या मागणीसाठी पेट्रोलपंप चालकांनी नोव्हेंबर 2016 मध्ये देशपातळीवर आंदोलन केलं होतं. या आंदोलनावेळी तेल कंपन्यांनी 4 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारच्या अपूर्वाचंद्रा कमिटीच्या निर्देशांनुसार पंप चालवण्याच्या खर्चाचा परतावा 1 जानेवारी 2017 पासून देण्याबाबतचा लेखी करार CIPD या देशपातळीवरील संघटनेशी केला होता.
मात्र या करारानुसार ठरलेल्या अटींना तीन महिन्यांपेक्षाही जास्त कालावधी उलटला आहे. तरीही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यासाठी राज्यातील पेट्रोलपंप चालकांनी 10 मे रोजी इंधन खरेदी न करत आंदोलन केलं. यावेळी FAMPEDA या संघटनेने तेल कंपन्यांना बैठक बोलावण्याची विनंती केली होती. मात्र याला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने पेट्रोलपंप चालकांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
राज्यात 14 मे पासून प्रत्येक रविवारी सर्व पंपचालक सामूहिक सुट्टी घेतील. या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजीही मिळणार नाही, असं पेट्रोलपंप चालकांनी स्पष्टी केलं आहे.
तर 15 मे पासून महाराष्ट्रातील सर्व पेट्रोलपंप सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत सिंगल शिफ्टनुसार चालतील, असंही पेट्रोलपंप चालकांनी सांगितलं आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.