कमिशनवाढीची मागणी करत पंपचालकांनी रविवार बंद आणि एका शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता. तो सध्या पुढे ढकलण्यात आला आहे. 17 मे रोजी ऑईल कंपन्यांनी पेट्रोल पंप चालक संघटनांना चर्चेसाठी बोलावल्यानं हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे.
याबाबत बोलताना फामफेडाचे अध्यक्ष उदय लोध म्हणाले की, "आमचं आंदोलन कॉस्ट कटिंग मोड्यूल होतं. कायद्याच्या चौकटीत राहूनच हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. तेल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांशी चर्चा करुन, पेट्रोल पंपचालकांच्या समस्यांवर तोडगा काढावा अशी आमची प्रमुख मागणी होती. परंतु आम्हाला कोणतीही संधी दिली नाही. उलट शासनाकडून आम्हाला पेट्रोल पंप ताब्यात घेऊ, मेस्मा लावू असं सांगण्यात येत होतं. त्यामुळे आम्ही कायद्याचा आदर करण्यासाठी हे आंदोलन थांबवत आहोत. कायद्याचा पुन्हा अभ्यास करुन पुढील दिशा ठरवू''
दरम्यान, पेट्रोल पंपधारकांनी येत्या 14 तारखेपासून केवळ एकाच शिफ्टमध्ये काम करण्याचा इशारा दिल्यानंतर काल प्रशासनानही आक्रमक भूमिका घेतली होती. पेट्रोल पंपचालकांनी आपला संप मागे न घेतल्यास त्यांची लायसन्स रद्द करु, असा इशारा औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी काल दिला होता.
सध्या पेट्रोलपंप चालकांना डिझेलला प्रति लीटर एक रुपया 45 पैसे एवढे कमिशन मिळते. या उलट पेट्रोल पंपाचा व्यवस्थापन खर्च सोयी-सुविधा पाहता हे कमिशन अत्यंत कमी असल्याने व्यवसाय करणं कठीण जात असल्याचं पेट्रोलपंप चालकांचं म्हणणं आहे.
मागण्यांसदर्भात सरकारकडे पाठपुरावा करुनही दखल घेतली जात नसल्याने पेट्रोल पंपचालकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं.