रत्नागिरी : सध्या नावं बदलण्याचा जमाना आहे. आणि आता पेट्रोलचेही नाव आता बदलणार असून त्याचे नाव पंडीत दीनदयाळ उपाध्याय बहुमूल्य तरल पदार्थ असे ठेवले तर यात नवल वाटायचे कारण नाही असा टोला  माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लगावला.

रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणून इतिहासाचा तज्ज्ञ शक्तीकांत दास आणला आहे. इथे इतिहास लिहायचा आहे का? इथे देशाची अर्थव्यवस्था सांभाळायची आहे. अक्षरश: अर्थव्यवस्थेची वाट लावली आहे असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी या सरकारकडे पैसे नाहीत परंतु वायफाय देण्यासाठी या सरकारकडे करोडो रुपये आहेत. आता मला सांगा तुम्हाला वायफाय हवा की, भाकरी हवी असा सवाल जनतेला भुजबळ यांनी केला.

आचारसंहिता नसतानाही पोलीस शुटींग करत का करताहेत ? अजित पवार

मारुतीची आज 'जात' काढली जात आहे. अरे कशाला देवांच्या जाती काढता. निवडणुका आल्या की यांना प्रभू रामचंद्र आठवलाच. प्रभू रामाचा आणि शिवसेनेचा कधी संबंध आला. आता शिवसेना राममंदिर बांधायला निघाली आहे, अरे साडेतीन वर्षे झोपला होतात का असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेला केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा खेड येथे पार पडली. यावेळी अजित पवार यांनी शिवसेनेवर तोफ डागली. आज गोत्र विचारलं जात आहे. विकासाचा आणि गोत्राचा काही संबंध आहे का? जात, पंथ, गोत्र काढून लोकांना भावनिक बनवायचं हेच सुरु आहे. आज जाहीर केले ते देता येत नसल्याने आता हे उद्योग सुरू आहेत असेही  पवार म्हणाले.शहरांची नावे बदलली जात आहेत. नावे बदलून समस्या सुटणार आहे का? नवीन शहरे करा. यातून काय साध्य केले जात आहे असा सवालही पवार यांनी केला.

निवडणुका नसतानाही किंवा आचारसंहिता नसतानाही पोलीस शुटींग करत आहेत. ही काय लोकशाही आहे का? कुणाच्या आदेशावर हे केले जात आहे. आम्ही सत्तेचा दुरुपयोग कधी केला नाही परंतु मागच्या दाराने ही आणीबाणी आणली जात आहे हा भाजपचा डाव आहे असा आरोपही अजित पवार यांनी केला.