आधी दोन महिलांशी लग्न, तिसऱ्या पत्नीने बिंग फोडलं
एबीपी माझा वेब टीम | 13 Nov 2017 08:15 PM (IST)
सचिनला दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगाही असल्याचं तपासात समोर आलं आहे.
अकोला : एक नाही, दोन नाही, तर तब्बल तीन महिलांसोबत विवाह करुन त्यांची फसवणूक करणाऱ्याला आज अकोला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सचिन कल्याणसिंग सेंगर असं या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सचिन सेंगर हा नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील इंद्रपुरीचा रहिवाशी आहे. तो सॉफ्टवेअर इंजिनीयर असल्याची माहिती त्याच्या तिसऱ्या पत्नीनं दिली आहे. सचिनला यात मदत करणाऱ्या त्याच्या कुटुंबातील सात जणांविरुद्धही फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सचिन सेंगरला अकोल्यातील खदान पोलिसांनी आज अटक केली. सचिन नागपुरात सॉफ्टवेअर इंजिनीयर आहे. 28 एप्रिल 2017 ला त्याचं लग्न अकोल्यातील ममता यांच्याशी झालं. मात्र, त्याची आधी दोन लग्न झाल्याची माहिती त्यानं ममता यांच्यापासून लपवून ठेवली. मात्र दिवाळीत त्याचं हे बिंग फुटलं. सचिनला दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगाही असल्याचं तपासात समोर आलं आहे. फसवणूक झालेल्या तिसरी पत्नी ममतानं अकोला पोलिसांत तक्रार केली आहे. अकोल्यातील खदान पोलिसांनी सचिनला अटक केली आहे. सचिन हुंडा आणि पैसे उकळणासाठी असं करीत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान, सचिनला यात मदत करणाऱ्या त्याच्या कुटुंबातील सात जणांविरुद्धही फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.