कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना आता घरातही मास्क वापरावा लागण्याची शक्यता आहे. महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी या संदर्भातल्या सूचना बैठकीमध्ये दिल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर तर मास्क वापरावा लागणारच मात्र आता कोल्हापूरकरांना घरामध्ये देखील मास्क वापरावा लागू शकतो.


कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाच हजारांच्या वर पोहोचली आहे. त्यामध्ये कोल्हापूर शहरातला आकडा हा सर्वाधिक आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील समूह संसर्ग कमी करण्यासाठी पालिकेचे आयुक्त कलशेट्टी यांनी हा एक वेगळा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. आतापर्यंत कोल्हापूर शहरांमध्ये दाट वस्तीच्या या ठिकाणी रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडायची असल्यास काही वेगळे पर्याय अवलंब केल्याशिवाय पर्याय नाही.


घरात कमी जागा असेल आणि कुटुंबातील सदस्यांची संख्या जर जास्त असेल तर कोरोनाचा धोका हा अधिक मानला जातो. एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली तर संपूर्ण कुटुंबाला कोणाची लागली होती होते हे आतापर्यंतच्या निरीक्षणावरुन समोर आले आहे. त्याचबरोबर अनेक घरांमध्ये बाहेरील व्यक्ती कपडे किंवा इतर घर कामासाठी येत असतात. ही व्यक्ती इतर ठिकाणीही काम करत असते. त्यामुळे बाहेरील व्यक्तीमुळे घरातील नागरिकांना धोका पोहोचू नये, यासाठी घरामध्ये देखील मास्क वापरणे गरजेचे असल्याचे कलशेट्टी यांनी सांगितले.


कोरोनाच्या संकटात लहान मुले आणि आणि वयोवृद्ध व्यक्तींची काळजी अधिक घेणे गरजेचे आहे. अशावेळी काही कामानिमित्त कुटुंबातील तरुण सदस्य घराच्या बाहेर जाऊन आला असेल तर किंवा जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊन आला असेल तर आपल्या कुटुंबाची काळजी म्हणून वयोवृद्ध नागरिकांसह घरातील नागरिकांनी मास्क वापरणे गरजेचे असल्याचे शेट्टी यांनी सांगितले आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा धोका वाढताच
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 5075 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 142 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 2092 रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. तर अजूनही ही 2841 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.