बारामती/बीड : उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीत आलेल्या अजित पवारांचं फुलांच्या वर्षावात आणि ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आलं आहे. यावेळी ओपन जीपमधून अजित पवारांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अजित पवारांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच परळीत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचाही अभूतपूर्व सत्कार करण्यात आला.


यावेळी अजित पवारांच्या स्वागतासाठी बारामतीकरांनी तुडूंब गर्दी केली होती. त्यांच्या समर्थकांनी चौकाचौकात त्यांना फुलांचा हार घातला. तर अनेक कार्यकर्ते बेधुंद होऊन नाचत होते.


अजित पवार राज्यात सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आलेले आमदार आहेत. बारामती मतदार संघात त्यांनी भाजप उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा त्यांनी तब्बल 1 लाख 65 हजार मतांनी पराभव केला आहे.


सामाजिक न्याय मंत्रिपद मिळाल्यानंतर धनंजय मुंडे यांचा परळीत आज नागरी सत्कार करण्यात येणार आहे. संध्याकाळी मुंडे यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे.


दरम्यान, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचादेखील त्यांच्या मतदारसंघात नागरी सत्कार करण्यात आला. काल (09 जानेवारी) धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर जाऊन भगवान बाबांचे आशीर्वाद घेतले. काल एकशे अकरा किलोंचा हार घालून त्यांचं गडावर स्वागत करण्यात आलं होतं. आज परळीवासियांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, गोपीनाथ मुंडेंनी रक्ताचं नातं तोडलं. पण आज इतक्या वर्षानंतर नियतीनं न्याय केला.