चंद्रपूर : चंद्रपूर शहरातल्या तुकूम भागातील एका चहाविक्रेत्याने रोखमुक्तीवर चर्चांचा फड रंगविणाऱ्यांना PayTM च्या एका बोर्डद्वारे उत्तर दिलं आहे. डिजिटल बँकिंग आणि क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, स्वॅपिंग केवळ मोठ्या खरेदीसाठी आहेत. रोजच्या गरजांसाठी मात्र अशा सेवांचा वापर जमीनपातळीवर शक्यच नाही, असाच सर्वसाधारण समज आहे. मात्र, चंद्रपुरातील चहावाल्याने हा समज खोटा ठरवला आहे.


8 नोव्हेंबरच्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर रोखमुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या समाजासाठी सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरु झाले. चलनबंदीनंतर चलनमुक्त व्यवहारासाठी सरकारी पातळीवरून आवाहनाचा मारा सुरु झाला. मात्र, सुट्ट्या पैशांची चणचण सुरु झाल्यावर या डिजिटल पेमेंट्सची पहिली स्वीकारार्हता सामान्य लोकांमध्ये दिसली आहे.

चंद्रपूर शहरातील या चहा विक्रेत्याने यातील संधी लगेच हेरली आणि त्याने ग्राहकांना सेवा देण्यासाठी थेट PayTM चा पर्याय निवडला. दीपक पेंदाम असे चहाविक्रेत्याचे नाव आहे.

दीपककडे चहा पिण्यासाठी येणारे ग्राहक ही या डिजिटल बदलाकडे सकारात्मक दृष्टीने पाहता आहेत. दीपकला ज्याप्रमाणे सुट्ट्या पैशांची चणचण होती, तशीच ग्राहकांनाही. मात्र या कॅशलेस पर्यायामुळे ग्राहकांचीही चिल्लरची समस्या सुटली आहे.

कधीकाळी चहाविक्रेता असलेल्या मोदींनी चलनबंदीनंतर देशवासियांना मागितलेले 50 दिवस संपायचे असताना चंद्रपूरच्या चहाविक्रेत्याने रोखमुक्तीचा उत्तम पर्याय निवडून या निर्णयाला आपले समर्थन दिले आहे. निर्णयाचे काय व्हायचे ते होवो मात्र पुढे जाण्याची जिद्द असलेल्या दिपकने व्यवहाराचा नवा मार्ग लागलीच स्वीकारला आहे.