सोलापूर : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाने काही नियम आखून दिले आहेत. मात्र सोलापुरात या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉस्पिटलविरोधात पालिका प्रशासनाच्यावतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रंगभवन परिसरात असणाऱ्या विनीत हॉस्पिटलविरोधात पालिकेच्यावतीने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनीत हॉस्पिटलचे संचालक डॉ. विद्याधर पंढरीनाथ सुर्य़वंशी यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद कऱण्यात आली आहे. 


सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे या रुग्णालयासंदर्भात तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आतिश बोरोडे, उपायुक्त धनराज पांडे, डॉ. बिरुदेव दुधभाते, लेखापरीक्षक डॉ. वैभव राऊत आदींनी जाऊन पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील अनेक गंभीर प्रकार समोर आले आहेत. हॉस्पिटलमध्ये संचालक असलेले डॉ. विद्याधर सुर्यंवशी यांचे वैद्यकीय शिक्षण हे आर्युवेद विषयातील आहे. मात्र रुग्णालयाबाहेर असलेल्या बोर्डवर सूर्यवंशी यांनी आपण एम.डी. फिजिशिअन असून हृदयरोग, मधूमेह, फूप्फूस विकार आणि आयसीयू तज्ञ असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे आर्युर्वेदाची डिग्री असताना अॅलोपॅथीची ड्रिग्री लिहून रुग्णांची दिशाभूल केल्याचा आरोप डॉ. सूर्यवंशी यांच्या विरोधात करण्यात आला आहे. 


तसेच रुग्णालयांकडे महाराष्ट्र नर्सिग अॅक्टचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. मात्र सदरील रुग्णालयकडे हे प्रमाणपत्र नव्हते. तसेच कोरोनाच्या काळात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महानगरपालिकेची परवानगी घेणे देखील आवश्यक आहे. मात्र या रुग्णालयाने महानगरपालिकेकडून देखील कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे कोविड बाधित रुग्णांवर अवैध पद्धतीने उपचार करत असल्याचा ठपका ठेवत पालिकेच्यावतीने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


दरम्यान  हॉस्पिटलचे नोंदणी प्रमाणपत्र, डॉक्टरांचे डिग्री आणि रजिस्टेशन सर्टिफिकेट हे दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे. कोविडच्या बाबतीत उपचार करताना शासनाने वेगवेगळ्या सूचना दिल्या आहे. मात्र यापैकी कोणत्याही नियमाचे पालन रुग्णालयतर्फे करण्यात आले नसल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल कऱत असल्याचे फिर्य़ादित नमूद करण्यात आले आहे. तर "संबधित रुग्णालयाने नियम मोडल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करुन रुग्णालय सील करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.