नागपूर : नागपूर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील धक्कादायक प्रकार एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णालाच वॉर्डची साफ-सफाई करायला लावली आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

रोशन हिवरेकर नागपूर  मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयामध्ये उपचार घेत होता. उपचारादरम्यान रोशनच्या शेजारील एका वृद्ध रुग्णाचं निधन झालं. तासभर वृद्धाचा मृतदेह तसाच बेडवर पडून होता. तासाभरानंतर आलेल्या वॉर्ड बॉयनं वृद्धाच्या मृतदेहाला लावलेली लघवीचं आणि नळी पाकीट ओढून काढलं. त्यावेळी पाकिटातील लघवी जमिनीवर सांडली. रोशनने वॉर्ड बॉयला त्याठिकाणी साफ-सफाई करायची विनंती केली. मात्र वॉर्ड बॉयने त्यासाठी स्पष्ट नकार दिला आणि तूच साफ कर, असा उर्मटपणे सल्लाही रोशनला दिला.

रोशनेही अस्वच्छतेचा त्रास होऊ नये म्हणून स्वत: फरशी पुसून काढली. तब्येत ठीक नसलेल्या रोशनला अशक्तपणामुळे नीट उभंही रातहा येत नव्हत. याही अवस्थेत त्याने वॉर्डमध्ये साफ-सफाई केली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. उर्मटपणे वागणाऱ्या आणि रुग्णालाच सफाई करायला सांगणाऱ्या वॉर्ड बॉयवर मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने उत्तर देणेही टाळलं आहे.