मुंबई : हापूस नक्की कुणाचा? देवगडचा की रत्नागिरीचा? या प्रश्नाचं उत्तर आहे अख्ख्या कोकणाचा... मुंबईतल्या पेटंट कार्यालयात झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला.
या निर्णयामुळे देवगड आणि रत्नागिरीची निराशा झाली असली, तरी दोन्ही आंबा उत्पादकांनी हा निर्णय मान्य केला.
2017 मध्ये देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस या दोन्ही आंब्यांना जीआय मानांकन देण्यात आलं. पण पेटंटचा प्रश्न आला, तेव्हा दोन्ही उत्पादकांमध्ये हापूसच्या नावावरुन जुंपली. अखेर हे प्रकरण पेटंट कार्यालयापर्यंत पोहोचलं. त्यावेळी दोन्ही उत्पादकांनी हापूस नावावर दावा केला, मात्र आज इंडियन पेटंटने दोन्ही पक्षांना धक्का देत वेगळाच निर्णय दिला.
पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत कोकणच्या कोणत्याही पट्ट्यात पिकणारा आंबा हा हापूस आंबा असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे आपल्या आंब्यापुढे हापूस हे नाव एक्स्क्लुझिव्हली मिरवण्याची दोन्ही उत्पादकांची संधी हुकली.