गडचिरोली: गडचिरोलीत एक मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. एक प्रवासी नाव बुडाल्याने दोन जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील सिरोंचा तालुक्यात असलेल्या इंद्रावती नदीवर ही घटना घडली असल्याची माहिती आहे. नावेत प्रवास करत असलेले तेरा जण सुरक्षित बाहेर पडले आहेत तर दोन महिला बेपत्ता असल्याची माहिती आहे. हा भाग दुर्गम असल्याने अद्याप या घटनेबद्दल सविस्तर माहिती समजू शकलेली नाही.


प्राथमिक माहितीनुसार सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली येथून हे लोक छत्तीसगड राज्यात एका कार्यक्रमासाठी दोन लहान नावेने गेले होते. कार्यक्रम आटोपून परत येताना ही दुर्घटना झाली आहे. सायंकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान घटना घडली. घटना महाराष्ट्र छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील दुर्गम नक्षलग्रस्त भागात घडल्याने प्रशासनाला उशिरा माहिती मिळाली. शोधमोहिमेत वन विभाग आणि पोलीसांची टीम दाखल झाली आहे. शोधमोहिम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती आहे.


माहितीनुसार, नावेत एकूण 15 प्रवासी करत प्रवास करत होते. त्यापैकी 13 प्रवासी आपला जीव वाचवत बाहेर पडण्यात यशस्वी झाले मात्र  2 महिला अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती पुढे येत आहे.  या दोन नावेत एकूण 15 प्रवासी प्रवास करत होते असून त्यापैकी 6 पुरुष तर 9 महिलांचा होता समावेश होता.  कांता सत्यम येलाम व शांता शिवय्या गावडे अशी बेपत्ता असलेल्या दोन महिलांची नावं आहेत.


काल हे सगळे लोक छत्तीसगढ राज्यात तेराव्याच्या कार्यक्रमाकरता गेले होते. परत येताना नावेला दगड लागल्याने नाव पटली झाली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे. दोन्ही नाव एकत्र बांधून प्रवास करत होते, त्यामुळे दोन्ही नाव एकत्र बुडाल्या. घटनेला 12 तास उलटूनही अद्यापही त्या दोन महिलांचा शोध न लागलेला नाही. घटनास्थळी पोलीस विभाग, महसूल विभागाचे आपत्ती व्यवस्थापन टीम आणि वन विभागाच्या टीम कडून शोधमोहिम युद्ध पातळीवर सुरू आहे