नवी मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू आणि अजित पवार (Ajit Pawar)  यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) आता पुन्हा ॲक्टिव मोडमध्ये पाहयला  मिळत आहे. पार्थ पवार सध्या मावळ मतदार संघातील गणेशोत्सव मंडळे आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेताना पाहिला मिळत आहेत. विशेष बाब म्हणजे याची सुरुवात त्यांनी मावळ लोकसभेची सुरुवात असणाऱ्या खारघर, कामोठे आणि पनवेल परिसरातून केल्याचे पाहयला मिळतं आहे.

Continues below advertisement

 आज पार्थ पवार यांनी खारघरमधील शंभूराजे मित्र मंडळ, कामोठे येथील स्वराज्य प्रतिष्ठान आणि पनवेल येथील एकता मिञ मंडळसह जवळपास 10 ते 12 मंडळात जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या देखील भेटीगाठी घेतल्या. यातील महत्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी शिंदेगटात सहभागी झालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आरोप करताना आपल्याला पुण्यातून लोकसभेची तयारी करायला सांगितलं असून शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासाठी नाही तर पार्थ पवार यांच्यासाठी सुरक्षित केला जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. परंतु आता पार्थ पवार यांचा आजचा दौरा पाहता पार्थ पवार पुन्हा एकदा आगामी काळात मावळमधून तर शड्डू तर ठोकणार नाहीत ना अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये गाववाले आणि बाहेरचे अशी केवळ चर्चाच रंगत नाहीतर इथलं राजकारण देखील यावरच अवलंबून आहे. हे निवडणुकांच्या निकालावरून याआधी ही अनेकदा अधोरेखित झालंय. मावळ लोकसभेतून शिवसेनेचे स्थानिक उमेदवार श्रीरंग बारणेंच्या पारड्यात मताधिक्य मिळालं, परिणामी बारामतीतून आलेल्या पार्थ पवारांना पराभव चाखावा लागला. कारण बारामतीचे पार्सल परत पाठवा हे निवडणुकीतील प्रचाराचा कळीचा एक मुद्दा होता. त्यानंतर पार्थ पवार मावळ लोकसभेतून पुन्हा नशीब आजमावणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

Continues below advertisement

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना आपल्या मुलाचा लोकसभेत झालेला पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता. पार्थ पवारांच्या रूपाने पवार घराण्यातील पहिल्याच व्यक्तीला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता याच पराभवाचे उट्टे काढण्यासाठी अजित पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी वेगळे नियोजन केल्याची चर्चा आहे. याचा एक भाग म्हणून पार्थ पवार पुन्हा अॅक्टिव्ह मोडमध्ये आले असून त्यांनी गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत गणेश मंडळांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.