परभणी : परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांच्यावर परस्पर जमीन बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील रामप्रसाद काळे यांच्याकडुन कुटुंबीयांच्या संमतीविना परस्पर जमीन खरेदी करून बळकावल्याचा आरोप काळे यांच्या कुटुंबीयांनी थेट पत्रकार परिषद घेऊन केला आहे. शिवाय काळे यांच्या दोन मुलींनी आई वडील आणि खासदारांच्या पत्नी विरोधात न्यायालयात धाव घेतलीय. मात्र, मी जमीन कायद्यानुसारच खरेदी केल्याचे सांगत खासदारांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक रामप्रसाद काळे हे मूळचे पुर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील रहिवाशी आहेत. त्यांना 2 मुली व स्वप्नील नावाचा एकच मुलगा होता. शिवाय स्वप्नील हा पहिल्यापासून शिवसैनिक होता व तो खासदार संजय जाधव यांचा कार्यकर्ताही होता. परंतु, स्वप्नीलचा मृत्यू हा लिव्हर सोयरासिस ने 18 एप्रिल 2019 रोजी झाला. स्वप्नील यांच्या मृत्यूनंतर रामप्रसाद काळे यांनी त्यांच्या 18 एकर शेतजमीनीपैकी 3 एकर 35 गुंठे जमीन 27 ऑक्टोबर 2020 रोजी परभणीचे खासदार संजय जाधव यांना 44 लाख 53 हजार रुपयांना विक्री केली.
खासदारांनी आरोप फेटाळले..
ही जमीन खासदारांनी त्यांच्या पत्नी क्रांती संजय जाधव यांच्या नावाने केलीय. मात्र, ही जमीन वडिलोपार्जित असताना वडिलांच्या बिघडलेल्या मानसिक परिस्थितीचा फायदा घेऊन आम्हाला विश्वासात व आमची संमती न घेता त्यांनी परस्पर विकत घेत बळकावली असल्याचा आरोप रामप्रसाद काळे यांच्या पत्नी प्रेमा काळे, त्यांच्या मुली सारिका आणि शीतल व त्यांची सुन वर्षा स्वप्नील काळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, मी ही जमीन चेकने पेमेंट करून खरेदी केलीय. परंतु, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचले असल्याचा आरोप खासदार संजय जाधव यांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी आणि शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्यात चांगलीच जुंपली आहे.