अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा शुभारंभ केल्याचा उदोउदो करीत आहेत. हा प्रकार म्हणजे, जुन्या काळात शिकारी लोक शिकारीनंतर असे ढोल बडवीत सर्व जंगलभर फिरत होते, तसाच हा प्रकार सुरु असल्याचा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. ते अकोला येथे आपल्या निवासस्थानी 'यशवंत भवन' येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मोदी आणि ठाकरेंनी जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेतली नाही?, असा सवालही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.


पंतप्रधानांनी लसीकरणाचे ढोल बडवत बसण्यापेक्षा कोविड लस स्वतः सिरींज भरून जनतेसमोर त्यामधील औषध टोचून घ्यावे. पंतप्रधानांनी असं केलं तरचं सामान्य जनतेला कोविड लसीबद्दल विश्वास निर्माण होईल. अन्यथा त्या बाटलीमध्ये लस किंवा नुसते पाणीच आहे, याबाबतचा संभ्रम दूर होईल, असं प्रकाश आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'जागतिक आरोग्य संघटने (डब्लूएचओ)च्या प्रमुखांनी जाहीर केल्याप्रमाणे आपल्या पंतप्रधानांनी इतर देशाच्या पंतप्रधानांसारखं नियोजन करणं गरजेचं होतं. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसं न करता मध्यमांसमोर मोठेपणाचं प्रदर्शन मांडल्याची टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.


धनंजय मुंडेना शरद पवारांचं 'अभय' : प्रकाश आंबेडकर


धनंजय मुंडे प्रकरणात शरद पवारांनी ज्या दिवशी प्रकरण गंभीर असल्याचं सांगितलं, तेव्हाच मुंडेंना शरद पवारांनी क्लिन चीट दिल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. पवारांच्या ठिकाणी आम्ही असतो, तर मुंडेंचा लगेच राजीनामा घेतला असता, असा टोलाही आंबेडकरांनी लगावलाय. आता मुख्यमंत्र्यांनीच ठरवावं की, त्यांच्या मंत्रिमंडळाचा चेहरा कसा असावा. मात्र, मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नसल्याचा चिमटाही आंबेडकरांनी यावेळी लगावला.


नामांतरण मुद्द्यापेक्षा 'महविकास आघाडी'ला सत्तेची 'सोन्याची कोंबडी' महत्वाची : प्रकाश आंबेडकर 


शहराच्या नामांतरणाच्या मुद्द्यावर पाच वर्ष महाविकास आघाडीची नाटकं सुरुच राहतील, अशी टीकाही आंबेडकरांनी केली आहे. या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षांची तोंडं तीन दिशेला आहेत. मात्र, या मुद्द्यावरून सरकार पडण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :