परभणी : बारा वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारे बदल पॉक्सो कायद्याअंतर्गत लागू झाल्यानंतर महाराष्ट्रातला पहिला गुन्हा परभणीमध्ये दाखल करण्यात आला आहे.


सात वर्षांची चिमुरडी आपल्या आई-वडिलांसह गावातून परभणी शहरात आली. बाजारात त्यांच्या ओळखीचा 30 वर्षीय तरुण सय्यद बबलू सय्यद अश्रफ भेटला. त्याने आई-वडिलांची नजर चुकवत या चिमुरडीचं अपहरण केलं आणि पूर्णा तालुक्यातल्या एका गावात नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

दुसरीकडे आई-वडिलांनी पोलिसात धाव घेतली आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या. चिमुकलीवर बलात्कार झाल्याचं सिद्ध झालं आणि फाशीची तरतूद केलेल्या नव्या पॉक्सो कायद्यांतर्गत राज्यातला पहिला गुन्हा दाखल झाला.

कठुआ प्रकरणामुळे जनतेमध्ये आधीच क्षोभ आहे. त्यामुळे हा संताप सोशल मीडियावरही उमटला. पण त्या नादात त्या चिमुकलीची हकनाक बदनामी मात्र झाली.

लहान मुलांवरच्या वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं कडक कायदे केलेही. पण हे कायदे अजूनही त्या गिधाडांच्या गावीच नाहीत.