परभणी : पत्नीच्या अपघाती मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पतीने आत्महत्या केल्याची घटना परभणीत घडली आहे. 'चंदा राणी मी तुला भेटायला येतोय' असे स्टेटस ठेवून पतीने गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेनंतर सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टेशन गावावर शोककळा पसरली आहे.
परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टेशन इथल्या सार्थक बचाटे आणि चंदा यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. 20 फेब्रुवारी रोजी पती-पत्नी दुचाकीवरुन गंगाखेडहून वडगावला जात असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात सार्थकची पत्नी चंदाचं निधन झालं. या घटनेचा सार्थकला मोठा धक्का बसला. अपघात झाल्यापासून तो नैराश्येत गेला होता.
याच नैराश्येतून सार्थकने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला 'चंदाराणी मी तुला भेटायला येतोय', तसंच आई, पप्पा, ताई, दाजी मला माफ करा मी चाललोय. तर मित्रांना उद्देशून भावांनो तुम्हाला सोडून चाललो, माझ्या मृत्युला कोणीही जबाबदार नाही, असं स्टेटस ठेवून गावशेजारील शेतात जाऊन झाडाला गळफास घेतला.
सार्थकने हे स्टेटस ठेवले तेव्हा मित्रांनी त्याचा खूप शोध घेतला. मात्र तो सापडला नाही आणि काही वेळातच त्याच्या आत्महत्येची बातमी आली. या धक्कादायक घटनेने वडगाव स्टेशन गावावर शोककळा पसरली आहे.
पत्नीचा अपघाती मृत्यू; 'मी तुला भेटायला येतोय,' असं स्टेटस ठेवून पतीची आत्महत्या!
पंकज क्षीरसागर, एबीपी माझा
Updated at:
12 Mar 2020 12:27 PM (IST)
दुचाकीवरुन जात असताना झालेल्या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने पतीने पत्नीच्या नावे "चंदा राणी मी तुला भेटायला येतोय" असे स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची घटना परभणीत घडली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -