परभणी : डोक्याला मुंडावळ्या, वाजंत्री, घोडीवर बसलेला नवरदेव, अशी लग्नाची वरात थेट मतदान केंद्रावर जाऊन पोहोचली आणि केंद्रावर एकच उत्साहाचं वातावरण तयार झालं. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगावमधील अमोल धुळे या तरुणाने तमाम मतदारांसमोर आदर्श ठेवला आहे.


लग्नघर म्हटलं तर सगळीकडे लगबग आलीच. अमोल धुळेच्या घरातही मागील दोन दिवसांपासून लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. परंतु लग्नाच्या गडबडीत मतदान चुकू नये अशी भूमिका अमोलने घेतली होती.

त्यामुळे अमोल धुळेने वरात लग्न मंडपात न नेता आधी मतदान केंद्रावर नेली आणि मतदान करुन त्याने आपला अधिकार बजावला.

मतदान करण्यासाठी अमोलने वेळ काढल्यामुळे त्याचं प्रचंड कौतुक होत आहे. शिवाय आपणही मतदानाचा हक्का बजावला पाहिजे अशी भूमिका लोकांनी घेतली.

LIVE : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज मतदान

दरम्यान, राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडत आहे. 15 जिल्हा परिषद आणि 165 पंचायत समितीसाठी हे मतदान सुरु आहे.

यामध्ये जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद या प्रमुख जिल्हा परिषदांचा समावेश आहे. 15 जिल्हा परिषदेच्या 855 जागांसाठी 4278 तर 165 पंचायत समित्यांच्या 1712 जागांसाठी 7693 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीमध्ये एकूण 17 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.