परभणी : कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला कि सर्वच संपलं, अशी भावना मागच्या काही दिवसांत रुग्णांमध्ये दिसून येतेय. त्यातच आजही या रुग्णांच्या जवळ जायला कुणी तयार होत नाही. हे रुग्ण हिरमुसून उपचार घेत आहेत तर रुग्णवाढीने डॉक्टर आणि नर्सेसही मोठ्या तणावात काम करताहेत. मात्र, परभणीत याच रुग्णांबरोबरच डॉक्टर आणि नर्सेस यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम एक कलाकार करतोय.
सध्या सोशल मीडियावर झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर सैराट नृत्य करत असलेले नर्स, रुग्ण आणि डॉक्टरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठल्या तरी कार्यक्रमाचा अथवा सेलिब्रेशनचा असेल तर तसं नाही. हा व्हिडीओ आहे परभणीतील कोविड केअर सेंटर मधील. मागच्या दोन दिवसांपासुन कोरोना बाधित रुग्ण असतील, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर असतील हे सर्वजण अशाच पद्धतीने विविध गाण्यांवर थिरकत आहेत. शिवाय अनेकजण गाणेही गात आहेत. कोरोनाने बाधित झालेल्या रुग्णांच्या मनोरंजनासाठी पालकमंत्री नवाब मलिक यांनी हा उपक्रम परभणीत सुरु केला आहे.
रुग्णही सहभागी..
मागच्या वर्षापेक्षा जास्त कालावधीपासुन कलावंत हे घरी बसुन आहेत. हाताला काम नाहीये. त्यामुळे परभणीतील कलावंत मधुकर कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी गाणे आणि नृत्य सादर करण्याचा निर्णय घेतला आणि दोन दिवसांपासून ते शहरातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन वेगवेगळे हिंदी, मराठी गाणे गात आहेत. शिवाय नृत्यहि सादर करत आहेत. यामुळे काही रुग्ण हसुन स्वतःही यात सहभाग घेत आहेत. काहींच्या चेहऱ्यावर हसु येतंय तर काही जणांना गहिवरून येतंय.
आज कोरोनाबाधितांच्या जवळ जायला नातेवाईकही धजावत नाहीत. बाहेरच्यांचे तर सोडाच त्यात बाधित असल्याचे कळल्यानंतर किमान 5 ते 7 दिवस विलीगीकरणात औषोधोपचार घ्यायचे. त्यातच आता लहान मुलेही बाधित होत असल्याने त्यांच्या काळजीपोटी आणि बरे होण्याच्या विचारात रुग्ण सर्वच विसरून गेलेत. शिवाय अतिरिक्त कामाच्या तणावात आरोग्य यंत्रणा वावरते आहेत. त्यामुळे स्वतःच्या जीवाची परवा न करता कांबळे या रुग्णांसमोर जी कला सादर करत आहेत, ज्याने हे रुग्ण आणि आरोग्य यंत्रणा एकदम फ्रेश आणि सकारात्मक होत आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णवाढ, मृत्यूदर वाढत आहे. त्यातच नकारात्मकता जास्त झालीय. प्रत्येकाने शक्य तेवढं सकारात्मकतेकडे वळले पाहिजे. जेणेकरून गंभीर कोरोना आजारावर आपल्याला काही प्रमाणात का होईना विजय मिळवता येईल आणि हेच काम आपल्या कलेतुन मधुकर कांबळे करताहेत.