परभणी : परभणी शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात कामासाठी जात असलेल्या एका 26 वर्षीय महिलेला दोन जणांनी कारमध्ये ओढत धावत्या कारमध्येच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यामुळे परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.
परभणीतील वसमत रोड परिसरामधील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक उद्योग आहेत. या ठिकाणी काम करण्यासाठी महिला कामगार ये-जा करत असतात. 30 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 1 च्या दरम्यात 26 वर्षे महिला याच परिसरात काम शोधण्यासाठी जात असताना पाठीमागून एक कार आली. या कारमधील दोन जणांनी तुम्ही कुठे जात आहात आम्ही तुम्हाला सोडतो असे म्हणत या महिलेला कारमध्ये ओढले आणि धावत्या कारमध्येच या महिलेवर बलात्कार केला. पुढे जाऊन एका चौकात या महिलेला कारमधून बाहेर ढकलून दिले. पीडित महिलेने तात्काळ शहरातील नवा मोंढा पोलीस ठाणे गाठून या ठिकाणी आपली तक्रार दिली. त्या तक्रारीवरून नवामोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून या दोन्ही आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.
या घटनेने इतर महिला कामगारांमध्ये पसरली दहशत
परभणीतील औद्योगिक वसाहतीमध्ये दिवस आणि रात्रपाळी मध्ये काम करणाऱ्या अनेक महिला आहेत. असे असताना भर दुपारी गाडीत ओढून नेऊन बलात्कार केल्याची घटना घडल्याने या येथील इतर महिला कामगारांमध्ये दहशत पसरली असून पोलिसांनी या आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करावी. तसेच या परिसरात पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक इतर कामगारांनी केली आहे.
एमआयडीसी पोलीस चोकीला मुहूर्त कधी लागणार ?
परभणी शहरासाठी एकूण तीन पोलीस स्टेशन असून यातील सर्वात जास्त भार हा नवा मोंढा पोलीस ठाण्यावर असतो. याच परिसरात औद्योगिक वसाहत येत असल्याने औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस स्टेशनचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवला होता. मात्र त्या प्रस्तावाचे पुढे अद्याप काहीही झालेले नाही त्यामुळे या परिसरात अनेक गुन्हे घडतात आणि त्यावर हवे तसे नियंत्रण नवा मोंढा पोलिसांचे राहत नसल्याने या एमआयडीसी पोलीस चौकीला मुहूर्त केव्हा लागणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे..