पनवेल : एलबीटीच्या मुद्द्यावर पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे आणि कारखानदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. आठवड्याभरात थकीत एलबीटी न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. याप्रकरणी कारखानदारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे.


पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून 75 कारखानदारांनी एलबीटी म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था कर भरलेला नाही. या 75 कारखानदारांकडून साधारणत: 300 कोटी रुपये थकीत एलबीटी येणं बाकी आहे. याबाबत आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी कारखानदारांबरोबर अनेकदा बैठकाही घेतल्या. मात्र, या कारखानदारांनी थकीत एलबीटी काही भरला नाही. यामुळे आयुक्त शिंदे यांनी या कारखानदारांना नोटिसा बजावत आठवड्याभरात एलबीटी भरण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ही शिंदे यांनी दिला आहे.

पनवेल महापालिकेच्या या नोटीसामुळे कारखानदारांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, आयुक्तांनी थेट कारवाईचा बडगा उगारल्याने या कारखानदारांनी आता थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घ्यायचा निर्णय घेतला आहे.