भगवानगड दसरा मेळावा ही लोकभावना : पंकजा मुंडे
एबीपी माझा वेब टीम | 23 Sep 2017 07:08 PM (IST)
एका बाजूला श्रद्धाळू तर दुसर्या बाजूला श्रद्धास्थान या परिस्थितीत निर्णय घ्यायचा आहे. लवकरच आपली भूमिका स्पष्ट करू, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.
बीड : भगवानगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याचा वाद यंदाही कायम आहे. गडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा दसरा मेळाव्याला विरोध कायम आहे. तर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक दसरा मेळाव्यासाठी ठाम आहेत. दसरा मेळावा ही लोकभावना आहे. त्यामुळे याबाबत लवकरच भूमिका जाहीर करू, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. भगवानगड दसरा मेळ्यावर पंकजा मुंडे काय म्हणाल्या? दरम्यान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याशी आपले काहीही मतभेद नाहीत, असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. एका बाजूला श्रद्धाळू तर दुसर्या बाजूला श्रद्धास्थान या परिस्थितीत निर्णय घ्यायचा आहे. लवकरच आपली भूमिका स्पष्ट करू, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली. भगवानगड दसरा मेळावा वाद काय आहे? दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर दसरा मेळाव्यात समर्थकांना संबोधित करायचे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ही परंपरा त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांनी चालू ठेवली. मात्र गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावर दसरा मेळावा यापुढे होणार नाही, अशी भूमिका गेल्या वर्षीपासून घेतली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. नामदेव शास्त्रींच्या या भूमिकेनंतर पंकजा मुंडे यांनी गडाच्या पायथ्याशी समर्थकांना संबोधित केलं. यावर्षीही हा वाद कायम आहे. एकीकडे मुंडे समर्थक दसरा मेळाव्यासाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे गडाचे महंत नामदेव शास्त्री त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. यावर्षी गडावर दसऱ्याला कोणत्याही व्हीव्हीआयपीला परवानगी देण्यात येऊ नये, असं पत्र नामदेव शास्त्रींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. संबंधित बातम्या :