बीडः भगवान गड वादाबद्दल आपण कोणतीही भूमिका आजवर मांडलेली नाही, कारण हा घरचा विषय आहे. त्यामुळे कन्या असताना घरच्या विषयावर बोलणं अयोग्य आहे, असं सांगत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवान गड दसरा मेळाव्याच्या वादावर मौन सोडलं आहे.


पंकडा मुंडेंनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत पहिल्यांदाच भगवान गडाच्या वादावर मौन सोडलं.

नामदेव शास्त्रींसोबत कोणताही वाद नाहीः पंकजा मुंडे

''दसऱ्याला भगवान गडावर जाण्याची पंरपरा कित्येक वर्षांपासून चालत आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गडावर जाणार आहोत.

भगवान बाबा आणि गडाचा अपमान होईल असं कोणतंही कृत्य कोणी करणार नाही. तसंच महंत नामदेव शास्त्री आणि आपल्यात कसलाही वाद नाही. त्यामुळे गडावर येणाऱ्या लाखो भाविकांशी संवाद साधायला नक्की आवडेल. भगवान गड हा राजकीय भाषणासाठी नाही, त्यामुळे गडावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा संबंधच नाही,'' असं स्पष्टीकरण पंकजा मुंडेंनी दिलं.

ऑडीओ क्लीपवर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण

पंकजा मुंडे यांची नुकतीच ऑडीओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यावरही पंकजांनी मौन सोडलं. ती क्लीप म्हणजे शेकडो कार्यकर्त्यांशी झालेला संवाद होता. त्यात काहीही बेजबाबदार वक्तव्य नव्हतं. मात्र राजकारण करण्यासाठी त्या क्लीपचा दुरुपयोग करण्यात आला. त्या ऑडीओ क्लीपची चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणीही केली आहे, असं पंकजांनी सांगितलं.