बीड : भगवानबाबांच्या जन्मगावी बीडमधील सावरगावात राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा आयोजित केलाय. त्यासाठी त्यांनी सावरगावात भगवानबाबांच्या मोठ्या मूर्तीसह स्मारक उभारलं असून, या स्मारकाचं अनावरणही आज करण्यात येणार आहे. तर तिकडे थोड्याच वेळात भाजप खासदार प्रीतम मुंडे गोपीनाथ गडावरुन रॅली घेऊन निघणार आहेत.

“संघर्षाच्या वाटचालीमध्ये सीमोल्लंघनाचा उत्सव आपल्याला ऊर्जा आणि प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाही. मी येत आहे तुमच्यासाठी, आपल्यासाठी, तुम्ही पण या!!”, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.


दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या काळात दसरा मेळावा भगवानगडावर वर्षानुवर्षे अगदी न चुकता होत असे. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवानगडावर मेळावा घेण्यावरुन वाद झाला. पुढे एक वर्ष भगवानगडावर दसरा मेळावा संपन्नही झाला. मात्र त्यानंतर दसरा मेळाव्यासारख्या चांगल्या सोहळ्यावरुन वाद व्हायला नको, म्हणून पंकजा मुंडे यांनी संत भगवान बाबांच्या जन्मगावी म्हणजे सावरगाव या गावी दसरा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. गेल्यावर्षीपासून सावरगावी मोठ्या उत्साहात दसरा मेळावा आयोजित केला जातो.

राज्यातल्या ओबीसी राजकारणाची दिशा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी वर्षानुवर्षे या मेळाव्याच्या माध्यमातून स्पष्ट केली. मात्र त्यांच्यानंतर या मेळाव्याचं नेतृत्त्व अर्थात पंकजा मुंडे यांच्या खांद्यावर आले आहे. येत्या काही महिन्यांवर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे मेळाव्याच्या व्यासपीठावरुन काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.