अमरावती: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या देशभर गाजत असलेल्या मी टू मोहिमेवर कडक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अभिनेता नाना पाटेकर कितीही खराब असो, पण महिलेसबोत गैरवर्तन करणार नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नानांची पाठराखण केली आहे. विदर्भ दौऱ्यादरम्यान काल ते अमरावतीत बोलत होते.
अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. दहा वर्षापूर्वी नानाने गैरवर्तन केल्याचं तनुश्रीने म्हटलं आहे. त्यानंतर देशभरात विविध क्षेत्रात मी टूचं वादळ उठलं आहे.
याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त करताना, नाना पाटेकरांची पाठराखण केली.
अमरावती येथे अंबा फेस्टिव्हल तर्फे आयोजित राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती तेव्हा ते बोलत होते. यावेळी राज म्हणाले, “नाना पाटेकर कितीही खराब असो, पण अशी कामं तो कधीच करणार नाही. हे मी टू पेट्रोल-डिझेल दरवाढ प्रकरण वळविण्यासाठी तर नाही ना? कारण सध्या जे बसले ते काहीही करु शकतात”
ट्विटरवर मी टू-मी टू करण्यापेक्षा जेव्हा तुमच्यावर असा प्रकार होतो, तेव्हाच का नाही आवाज उठवला जात? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
मी तर माझ्या सर्व आया-बहिणींना आवाहन करतो की असा प्रकार झाला की मला फोन करा, मी बघतो काय करायचं, अशा शब्दात राज ठाकरे यांनी इशारा दिला.
राज- नाना वाद
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि नाना पाटेकर यांच्यातही शाब्दिक चकमक झाली होती. एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेनं आक्रमक भूमिका घेत फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. त्यावर बोलताना नाना पाटेकरांनी नाराजी व्यक्त करत मनसेच्या भूमिकेला विरोध केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत नाना पाटेकरांचा समाचारही घेतला होता.
नाना पाटेकरांनी माहिती नसताना उगाच चोंबडेपणा करु नये : राज ठाकरे
मुंबईत फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर असताना, अभिनेता नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांच्या बाजूने सूर आवळला होता. "भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता," असा सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केला होता.
नानांच्या या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. "नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करु नये, ज्या विषयाची माहिती आहे, त्याबद्दल बोलावं," अशा शब्दांत राज ठाकरेंनी नानांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता.
#MeToo चं वादळ
बॉलिवूडपासून दूर गेलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताने आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याची आठवण काही दिवसांपूर्वी सांगितली होती. 2008 साली 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. 'हॉर्न ओके..' सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असा दावा तनुश्रीने केला. तनुश्रीने अभिनेता नाना पाटेकर, हॉर्न ओके प्लीज चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग, कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि निर्माते सामी सिद्दीकी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तनुश्रीने आवाज उठवल्यानंतर सोशल मीडियात MeToo वादळाने जोर धरला. विविध क्षेत्रातील महिलांनी #Metoo या हॅशटॅगने आपल्यावरील अत्याचाराची माहिती सोशल मीडियावर दिली.
संबंधित बातम्या
भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांना का हटवता? : नाना पाटेकर
नाना पाटेकरांनी माहिती नसताना उगाच चोंबडेपणा करु नये : राज ठाकरे
मनसेचा प्रचार ब्ल्यू प्रिंटने, तर भाजपचा ब्ल्यू फिल्म दाखवून : राज ठाकरे
राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं : नाना
नाना कितीही खराब असो, पण गैरवर्तन करणार नाही: राज ठाकरे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Oct 2018 07:47 AM (IST)
अभिनेता नाना पाटेकर कितीही खराब असो, पण महिलेसबोत गैरवर्तन करणार नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नानांची पाठराखण केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -